HMPV outbreak in China: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाला महामारी घोषित करण्यात आले होते. या व्हायरसच्या प्रसारामुळे लॉकडाऊन तर लावण्यात आले होतेच, मात्र यामुळे लाखो लोकांना प्राण गमवावे लागले. आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसने थैमान घातले आहे. जपानमध्येही या व्हायरसचा प्रसार झाला आहे. या व्हायरसचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) आहे.
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसमुळे (Human metapneumovirus)चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश आहे. हा व्हायरस नक्की काय आहे? व याची लक्षणे काय आहेत? याविषयी जाणून घेऊयात.
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (Human metapneumovirus) काय आहे?
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचा (HMPV) सर्वात प्रथम शोध वर्ष 2001 मध्ये डच संशोधकांनी लावला. HMPV हा एक आरएनए व्हायरस असून, याचा न्युमोवायरिडे गटाशी संबंध आहे. हा व्हायरस श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतो. प्रामुख्याने शिंकणे आणि खोकल्यामुळे या व्हायरसचा प्रसार होतो. याची लागण 3 ते 5 दिवस असते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये याचा प्रसार वाढतो.
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (Human metapneumovirus) लक्षणे काय आहेत?
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा व्यक्तीच्या श्वसनमार्गावर परिणाम करतो. या संसर्गजन्य आजार आहे. शिंकणे व खोकल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याची लागण होते. याची लक्षणे सामान्य तापाप्रमाणेच आहेत. या आजाराची लागण झाल्यास व्यक्तीमध्ये ताप येणे, सर्दी, खोकला, थकवा जाणवणे अशी लक्षणे जाणवतात. याचे प्रमाण अधिक वाढल्यास व्यक्तीला न्युमोनिया देखील होऊ शकतो.