HSRP Number Plate: वाहनधारकांना मोठा दिलासा, एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची मुदत पुन्हा वाढली

HSRP Number Plate Last Date Extended | हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता ही नंबर प्लेट (HSRP Number Plate) बसवण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा मुदत वाढवण्यात आली आहे.

30 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  आतापर्यंत फारच कमी वाहनांवर एचएसआरपी बसवले गेले आहे. त्यामुळे ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारवर एचएसआरपी ( HSRP ) बसवण्यासाठी अतिरिक्त पैसे आकारल्याबद्दल टीका देखील होत आहे. सुरुवातीला 30 मार्चनंतर मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 18 लाख वाहनांनी एचएसआरपी बसवल्याचा अंदाज आहे.

याआधी 1 एप्रिल 2025 नंतर, राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स (एचएसआरपी) अनिवार्य करण्यात आले होते. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. नागरिक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आणि त्यांच्या शहरातील अधिकृत केंद्रावर ही नंबर प्लेट बसवू शकतील.

तुम्ही transport.maharashtra.gov.in या वेबसाइटच्या माध्यमातून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी नोंदणी करू शकता. एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी टू-व्हीलर आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, थ्री-व्हीलरसाठी 500 रुपये, तर फोर-व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये खर्च येईल.