HMPV Virus Symptoms : चीनमध्ये थैमान घालणारा ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) आता भारतातही आढळला आहे. कर्नाटकमध्ये या व्हायरसची लागण झालेले दोन रुग्ण आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने देखील याबाबत तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस किती धोकादायक?
ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) अर्थात एचएमपीव्ही हा कोणताही नवीन व्हायरस नाही. 2001 मध्ये सर्वात आधी हा व्हायरस आढळला होता. प्रामुख्याने हिवाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. थंडीमध्ये या आजाराची लागण होण्याचे प्रमाण जास्त असते. विशेषता 11 वर्षांखालील मुलांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्यायला हवी.
ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसची लक्षणं (HMPV Virus Symptoms) काय?
या व्हायरसमुळे (Human Metapneumovirus) श्वसन संक्रमण वाढते. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवतो. गंभीर प्रकरणामध्ये काहीजणांना श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो. याशिवाय, डोकेदुखी, ताप येणे आणि थकवा जाणवणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत. यावर नियमित सर्दी व ताप आल्यावर करण्यात येणारे उपाययोजनाच केल्या जातात. म्हणजेच, सामन्यपणे जी औषधे दिली जातात, त्याचाच वापर केला जातो.
नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी?
एमएमपीव्ही (HMPV) हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे संक्रमित व्यक्तीपासून लांब राहायला हवे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना मास्कचा प्रवास करावा. हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत. वारंवार डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करू नये. तसेच, कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधावा.