Gudi Padwa 2025: यावर्षी गुढीपाडवा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Gudi Padwa 2025 | गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. याशिवाय, महाराष्ट्रातील हा एक महत्त्वाचा सण आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा होणारा हा सण विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. हा सण नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धीचा संदेश घेऊन येतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, जी ब्रह्मध्वज म्हणून ओळखली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा दिवस शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणूनही याला विशेष महत्त्व आहे. 

यावर्षी गुढीपाडवा कधी आहे, त्याचे शुभ मुहूर्त आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.

यावर्षी गुढीपाडवा कधी आहे? (Gudi Padwa 2025: Date and Auspicious Timings)

यावर्षी गुढीपाडवा 30 मार्च 2025, रविवार रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी ही 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल. तर 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल.मुहूर्त 29 तारखेपासून सुरू होत असला तरीही यंदा गुढीपाडवा 30 मार्च रोजीच साजरा केला जाणार आहे.

गुढीपाडव्याचे महत्त्व (Significance of Gudi Padwa)

हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात याच दिवसापासून होत असल्याने हा दिवस सर्वांसाठीच खास असतो. गुढीपाडव्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.  

पौराणिक कथेनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, म्हणून या तिथीला विशेष स्थान आहे.  तसेच, भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारली गेली, अशीही आख्यायिका आहे. या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते, ज्यामध्ये देवी दुर्गेची पूजा केली जाते.  

या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. नवीन संकल्प करण्यासाठी हा दिवस शुभ समजला जातो.