MPs’ salary hiked | केंद्र सरकारद्वारे लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदारांच्या (MP Salary Hike) वेतनात 24 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.
नवीन वाढीनुसार, खासदारांचे (Salaries, Pensions, Allowances Of MPs Increased) मासिक वेतन 100,000 रुपयांवरून 124,000 रुपये करण्यात आले आहे, तर दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये झाला आहे. माजी खासदारांचे पेन्शन 25,000 रुपयांवरून 31,000 रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. तसेच, 5 वर्षांपेक्षा जास्त सेवेसाठी अतिरिक्त पेन्शन 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये प्रति महिना वाढविण्यात आले आहे.
हा बदल संसद सदस्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शन कायदा, 1954 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून करण्यात आला आहे. वेतन वाढ आयकर कायदा, 1961 (Income-tax Act, 1961) मध्ये नमूद केलेल्या खर्च महागाई निर्देशांकावर आधारित आहे.
2018 साली खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये शेवटची वाढ झाली होती, त्यावेळी मूळ वेतन 100,000 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले होते. तसेच, मतदारसंघ भत्ता 70,000 रुपये, कार्यालयीन खर्चासाठी 60,000 रुपये आणि संसदीय अधिवेशनादरम्यान दैनिक भत्ता 2,000 रुपये होता. आता या भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे.
खासदारांना इतर सुविधांमध्ये दरवर्षी फोन आणि इंटरनेट वापरासाठी भत्ता, वर्षातून 34 मोफत देशांतर्गत विमान प्रवास, प्रथम श्रेणी रेल्वे प्रवास, इंधन खर्च, दरवर्षी 50,000 युनिट वीज आणि 4,000 किलोलीटर पाणी मोफत मिळते. तसेच, दिल्लीत 5 वर्षांसाठी भाडेमुक्त निवासस्थानाची सोय केली जाते. आता वेतन वाढीच्या निर्णयामुळे विद्यमान आणि माजी खासदारांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.