सायबर फसवणुकीबाबत सरकारची मोठी कारवाई, WhatsApp, Skype अकाउंट्ससह लाखो सिम ब्लॉक

Govt blocked 7.81 lakh SIM cards | केंद्र सरकारद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कठोर पावले उचलले जात आहे. गेल्याकाही वर्षात सातत्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (cyber fraud) घटना वाढल्या आहेत. आता सरकारकडून याबाबत कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने यावर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन फसवणुकीमध्ये सहभागी असणारे 7 लाख 81 हजार सिम कार्ड्स (SIM cards) ब्लॉक केले आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना याबाबतची आकडेवारी दिली. त्यांनी माहिती दिली की, कायदा अंमलबजावणी एजन्सीने या वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत डिजिटल फसवणुकीसंबंधी 7.81 लाखांहून अधिक सिम कार्ड ब्लॉक केले आहेत. तसेच, पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदवलेले एकूण 2,08,469 IMEI क्रमांक भारत सरकारने ब्लॉक केले आहेत.

याशिवाय, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) डिजिटल फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले 3,962 स्काइप आयडी (Skype IDs) आणि 83,668 व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट (WhatsApp accounts) ब्लॉक केले आहेत.

कुमार यांनी माहिती दिली की, I4C अंतर्गत सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टम 2021 मध्ये सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आर्थिक फसवणुकीची त्वरित तक्रार नोंदवता येते आणि फसवणूक करणारे पैसे काढून घेण्यापूर्वीच ती प्रक्रिया थांबवता येते. आतापर्यंत 13.36 लाखांहून अधिक तक्रारींमध्ये सुमारे 4,386 कोटी रुपये वाचवण्यात आले आहेत.

दरम्यान, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत आहे. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी अनोळखी व्यक्तीशी बँक खात्याशी संबंधित माहिती शेअर करू नये. तसेच, ओटीपी अथवा पासवर्ड शेअर करणे टाळावे. फसवणूक झाल्यास त्वरित बँक व पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.