Centre Discontinues Gold Monetisation Scheme | केंद्र सरकारने सुवर्ण मुद्रीकरण योजनेसंदर्भात (Gold Monetisation Scheme) मोठा निर्णय घेतला. सरकारने सुवर्ण मुद्रीकरण योजनेतील मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत सरकारी ठेवी बंद करण्याची घोषणा केली आहे. सरकारद्वारे 2015 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे 31,164 किलो सोने जमा करण्यात आले आहे.
सुवर्ण मुद्रीकरण योजनेतील मध्यम आणि दीर्घ मुदत ठेव बंद झाली असली तरीही बँका 1 ते 3 वर्षांच्या अल्पकालीन सुवर्ण ठेवी सुरू ठेवू शकतात.
सुवर्ण मुद्रीकरण योजनेच्या (GMS) कामगिरीचे मूल्यमापन आणि बदलत्या बाजार परिस्थितींचा विचार करून या योजनेतील मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत सरकारी ठेवी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. आता यापुढे या योजनेंतर्गत मध्यम आणि दीर्घ मुदत कालावधीसाठी कोणत्याही बँक शाखेत सोने ठेवले जाणार नाही.
दरम्यान, केंद्र सरकारद्वारे सुवर्ण मुद्रीकरण योजना 15 सप्टेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. यामागील उद्दिष्ट देशाचे सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि घरगुती तसेच संस्थात्मक पातळीवरील सोन्याचा देशात उपयोगासाठी वापरणे हे होते.
या योजनेंतर्गत अंतर्गत अल्प मुदतीच्या बँक ठेवी संबंधित बँकांच्या व्यावसायिक व्यवहार्यता आणि निर्णयानुसार सुरूच राहणार आहेत.