Google Pay’s Convenience Fees : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मवर आधारित इंस्टंट पेमेंट अॅप Google Pay चा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मची सुविधा मोफत होती. मात्र, आता गुगल पे ने काही सेवांवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
गुगल पे ने क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या काही बिल भरपाईसाठी सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. सध्या, GPay वर मोबाइल रिचार्जसाठी 3 रुपये सेवा शुल्क घेतले जात आहे. आता, विजेचे बिल, पाइपलाइन गॅस आणि पाणी यांसारख्या सेवांच्या बिल भरण्यासाठी सेवा शुल्क द्यावे लागणार आहे. याशिवाय, या शुल्कासोबतच बिलांवर जीएसटी देखील लागू केला असेल.
नवीन बदलांनुसार, GPay यूजर्सला आता युटिलिटी बिल पेमेंटवर GST व्यतिरिक्त व्यवहाराच्या रकमेच्या 0.5 ते 1 टक्के दरम्यान सेवा शुल्क आकारले जाईल. या सुविधा शुल्काला डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रोसेसिंग फी असे म्हटले जात आहे.
सध्या इतर UPI प्लॅटफॉर्म्स जसे की Paytm आणि PhonePe देखील बिलांवर शुल्क आकारतात. Paytm 1 रुपया ते 40 रुपयांपर्यंत शुल्क लावते, तर PhonePe डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे बिल भरपाईवर Google Pay प्रमाणेच शुल्क आकारते. अशाप्रकारे शुल्क आकारले जात असल्याने या प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.