EPFO to raise auto claim limit | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) आपल्या 7.5 कोटी सदस्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार आहे. PF काढण्याची प्रक्रिया आणखी वेगवान करण्यासाठी EPFO ने ऑटो-सेटलमेंट प्रणाली अंतर्गत आगाऊ दाव्याची मर्यादा 1 लाख रुपयांवरून थेट 5 लाख रुपयांपर्यंत (EPFO claim limit) वाढवली आहे. यामुळे सदस्यांना मोठी आर्थिक सुविधा मिळणार आहे.
श्रीनगर येथे केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 113 व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता अंतिम मंजुरीनंतर, ऑटोमेटेड सेटलमेंट ऑफ ॲडव्हान्स क्लेम्स (ASAC) प्रणालीद्वारे सदस्यांना अवघ्या 3 दिवसांत पैसे मिळतील. यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये ही सुविधा केवळ मेडिकल इमर्जेन्सीपुरती मर्यादित होती, परंतु नंतर ती शिक्षण, विवाह आणि गृहनिर्माणासाठीही उपलब्ध करून देण्यात आली.
AI-आधारित क्लेम प्रक्रिया
मे 2024 मध्ये EPFO ने दाव्याची मर्यादा 50,000 वरून 1 लाख केली होती. आता ती थेट 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO च्या AI-आधारित ऑटो-क्लेम सिस्टममुळे 95% दावे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निकाली निघणार आहेत.
2024-25 आर्थिक वर्षात आतापर्यंत विक्रमी 2.16 कोटी ऑटो-क्लेम सेटलमेंट झाले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ दर्शवतात. तसेच, दाव्यांची नामंजुरीची टक्केवारी 50% वरून 30% पर्यंत खाली आली आहे.
PF पेमेंट आता UPI द्वारेही शक्य
EPFO ने PF पेमेंट अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच सदस्यांना पेटीएम, गुगल पे आणि फोनपे यासारख्या ॲप्सच्या माध्यमातून थेट त्यांच्या PF खात्यात पैसे मिळतील.
कामगार मंत्रालयाने यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. मे-जून 2025 पर्यंत ही सुविधा लागू होण्याची शक्यता आहे. UPI प्रणालीमुळे PF पेमेंट प्रक्रिया 2-3 दिवसांवरून काही मिनिटांवर येईल आणि दाव्यांच्या मंजुरीचा वेग वाढेल. भविष्यात ही सुविधा GPF आणि PPF यांसारख्या योजनांसाठीही लागू केली जाणार आहे.
EPFO च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीसाठी लवकरच जलदगती आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होणार आहे.