MS Dhoni : आधी सूर्या आणि आता… धोनीचे विजेच्या वेगाने स्टंपिंग; विराट पण झाला चकित

MS Dhoni Stumping | आयपीएल 2025 (IPL 2205) च्या आठव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 50 धावांनी पराभव केला. यासोबतच आरसीबीने या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. मात्र, या सामन्यापेक्षा सर्वाधिक चर्चा महेंद्रसिंग धोनीची रंगली आहे. धोनीने त्याच्या विकेटकिपिंगच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनीने सूर्यकुमार यादवला स्टंपिंग करत माघारी धाडले होते. आता आरसीबीविरुद्ध देखील धोनीची चपळता पाहायला मिळाली. अगदी विजेच्या वेगाने स्टंपिंग करत धोनीने फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला.

 विकेटच्या मागे धोनीने नूर अहमदच्या चेंडूवर फिल साल्टला ज्या वेगाने स्टंप आउट केले, ते पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. फिल साल्टसोबत नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला विराट कोहलीसुद्धा धोनीच्या या वेगाने चकित झाला.  

खरं तर, चेन्नई सुपर किंग्सच्या डावाच्या 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फिल साल्टने एक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो चुकला. फिल साल्ट अवघ्या काही इंच क्रीजच्या बाहेर असतानाच धोनीने मागून स्टंपिंग करत त्याला माघारी पाठवले. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावत 196 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत केवळ 146 धावा करू शकला. या सामन्यात चेन्नईचा 50 धावांनी पराभव झाला.