‘चीनने चूक केली…’, अमेरिकेवर 34% कर लावल्याने ट्रम्प भडकले, म्हणाले…

TRUMP TARRIFS | अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढविल्यानंतर चीननेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चीन सरकारने (USA) अमेरिकेवर 34 टक्के जवाबी शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क 10 एप्रिलपासून लागू होणार आहे. (Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना चीनवर पुन्हा टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, “चीनने चुकीचा डाव खेळला, ते घाबरले – त्यांना परवडणार नाही अशी गोष्ट त्यांनी केली!”

चीन सरकारने अमेरिकेच्या निर्णयाचा निषेध करत म्हटले की, हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन आहे. चीनचे हित आणि कायदे यांचं नुकसान होईल, अशा प्रकारे एकतर्फी दबाव टाकणं स्वीकारार्ह नाही.

अमेरिकेने 60 हून अधिक देशांवर नव्याने आयात शुल्क लावलं असून, त्यात चीनवर सर्वाधिक 34 टक्के शुल्क ठोठावण्यात आलं आहे. याआधी ट्रम्प प्रशासनात (Trump Tariffs) महिन्याभरात दोन वेळा 10 टक्क्यांनी शुल्क वाढवण्यात आलं होतं. त्यामुळे एकूण शुल्क 54 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

याच्या प्रत्युत्तरात चीनने केवळ शुल्कच वाढवलं नाही, तर इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, आणि दुर्मिळ पृथ्वीचे घटक यासारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील वस्तूंवरही निर्बंध लावले आहेत. चीनने 16 अमेरिकन कंपन्या त्यांच्या ‘निर्यात नियंत्रण यादीत’ टाकून चिनी कंपन्यांना त्यांच्याशी व्यवहार करण्यास मनाई केली आहे.

या व्यापार युद्धाचा (Trade War) जागतिक अर्थव्यवस्थेवर तात्काळ परिणाम झाला. अमेरिकन स्टॉक फ्युचर्समध्ये मोठी घसरण झाली असून लंडनच्या निर्देशांकात 300 अंकांची घट नोंदली गेली आहे. Stoxx 600 निर्देशांक 4.4 टक्क्यांनी घसरला आहे, तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती 6.6 टक्क्यांनी घसरून $65.50 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. ही किंमत ऑगस्ट 2021 नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे.