Chhaava Box Office Collection: ‘छावा’ने बॉक्स ऑफिस गाजवले, विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई

विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला पीरियड ड्रामा चित्रपट ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत.  ‘छावा’ हा 2025 मधील रिलीजच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विकीच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग चित्रपटही बनला आहे.

“छावा” ने पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी करत सर्व भाषांमध्ये सुमारे 31 कोटी रुपयांची कमाई केली. या दमदार कमाईसह “छावा” विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने “उरी: द सर्जिकल स्ट्राइक” च्या 8.20 कोटी रुपयांच्या ओपनिंग रेकॉर्डला मागे टाकले आहे.

अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या कमाईचा विक्रम देखील ‘छावा’ने मोडला आहे. स्काय फोर्सने पहिल्या दिवशी 12.25 कोटींचा कलेक्शन केले होता. आता ‘छावा’ ने हा विक्रम मोडला आहे.

दरम्यान, विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे.अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे.