ChatGPT, DeepSeek सारख्या एआय टूल्सबाबत केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

एकीकडे एआय टूल्सचा वापर वाढत असताना यूजर्स डेटाबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना सरकारी उद्देशांसाठी AI टूल्स, जसे की ChatGPT आणि DeepSeek वापरणे टाळावे, असे आदेश दिले आहे. वित्त मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इटलीसारख्या देशांनीही डीपसीकच्या वापरावर डेटा सुरक्षा धोक्यांच्या कारणास्तव अशाच प्रकारची निर्बंध घातली आहेत. आता वित्त मंत्रालयाने देखील सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये AI टूल्स जसे की ChatGPT आणि DeepSeek चा वापरा टाळावा, असे म्हटले आहे. यामुळे सरकारी दस्तऐवज आणि डेटाच्या गुप्ततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

वित्त मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे की, कर्मचारी ऑफिसच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर एआय अ‍ॅप्सचा वापर करतात. मात्र, हे सरकारच्या गोपनीय दस्तऐवज आणि डेटासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

एआय टूल्सचा वापर टाळण्याचे आदेश का?

AI टूल्स जसे की ChatGPT आणि DeepSeek हे यूजर्सचा डेटा बाह्य सर्व्हरवर प्रोसेस करतात, ज्यामुळे संवेदनशील सरकारी डेटा लीक होण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांमध्ये गुप्त वित्तीय डेटा, धोरण मसुदे आणि आंतरिक संवाद हाताळले जातात, त्यामुळे अशी माहिती लीक झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

तसेच, हे टूल्स क्लाउड-आधारित आणि खासगी कंपन्यांकडून चालवले जातात, ज्यामुळे सरकारला या टूल्सवरील नियंत्रण नाही. त्यामुळे वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना या टूल्सचा वापर बंद करण्यास सांगण्यात आले आहे.