भारताची ताकद वाढणार, स्वदेशी ATAGS आर्टिलरी गन खरेदीला सरकारची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने अॅडव्हान्स्ड टोअड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) खरेदीला मंजुरी दिली आहे. जवळपास 7,000 कोटी रुपये खर्चून या आर्टिलरी गन प्रणालीची खरेदी केली जाणार आहे. हे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

ATAGS (Advanced Towed Artillery Gun System) ही भारतामध्येच डिझाइन, विकसित आणि निर्मिती केलेली पहिली 155 मिमी आर्टिलरी गन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट मारक क्षमतेमुळे ती भारतीय सैन्याची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवेल.  

ATAGS ही प्रगत टोअड आर्टिलरी गन प्रणाली असून 52-कॅलिबर लांब बॅरल असलेली ही तोफ 40 किमीपर्यंत लांब पल्ल्याचा मारा करू शकते. मोठ्या कॅलिबरमुळे या प्रणालीची मारक क्षमता अधिक असून ती अधिक स्फोटक शक्तीसह लक्ष्य भेदू शकते. यामुळे ही आर्टिलरी गन भारतीय सैन्यासाठी मोठा ताकदवान पर्याय ठरणार आहे. या मंजुरीमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञान प्रगतीतील मोठी वाढ अधोरेखित होते.  

ATAGS चा समावेश भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जुन्या 105 मिमी आणि 130 मिमी तोफांच्या जागी ही अत्याधुनिक आर्टिलरी गन तैनात केली जाईल. देशाच्या पश्चिम आणि उत्तरी सीमेवर तिची तैनाती केल्याने लष्कराला मोठा धोरणात्मक फायदा मिळेल. यामुळे सैन्याची तयारी आणि मारक क्षमता आणखी मजबूत होईल.  

ATAGS स्वदेशी असल्याने भारताच्या संरक्षण क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे. तसेच, शस्त्रास्त्रांसाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्वही कमी होईल.