Prachand Helicopter | भारताने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तब्बल 62,000 कोटी रुपयांचा हा करार हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड (Hindustan Aeronautics Ltd – HAL) सोबत करण्यात आला असून, त्याअंतर्गत भारतातच तयार होणारी 156 लाइट कॉम्बॅट ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर (Prachand Helicopter) खरेदी केली जाणार आहेत.
156 पैकी 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला, तर 66 हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला दिली जाणार आहेत. ही हेलिकॉप्टर्स HAL च्या कर्नाटकातील तुमकुरु येथील अत्याधुनिक प्लांटमध्ये तयार केली जातील.
चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर देशाच्या हवाई संरक्षणाला अधिक बळकटी देण्यासाठी या हेलिकॉप्टर्सची तैनाती केली जाईल. या मोठ्या करारामुळे देशात रोजगाराच्या संधींची वाढ होणार असून, एरोस्पेस क्षेत्राच्या विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
‘प्रचंड’ हेलिकॉप्टर हे एक अत्याधुनिक हल्लेखोर हेलिकॉप्टर असून ते 5,000 ते 16,400 फूट उंचीवर सहजपणे उतरू आणि उड्डाण करू शकते. यामुळे सियाचिन ग्लेशियर आणि पूर्व लडाखसारख्या अतिउंच आणि दुर्गम भागांमध्ये ते प्रभावीपणे कार्यरत राहू शकते. या हेलिकॉप्टरमध्ये हवा ते जमीन आणि हवा ते हवा अशा दोन्ही प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, ज्यामुळे ते बहुआयामी धोक्यांचा सामना करण्यास सक्षम आहे.
संरक्षण मंत्रालयाने या आर्थिक वर्षात 2.09 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या संरक्षण करारांवर स्वाक्षरी केली आहे, त्यापैकी हा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची (Prachand Helicopter) क्षमता लक्षात घेता, ऑक्टोबर 2022 मध्येच ते औपचारिकपणे भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. आता मोठ्या प्रमाणात खरेदीमुळे हवाई दलाची ताकद अधिक वाढणार आहे.
‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची (Prachand Helicopter) प्रमुख वैशिष्ट्ये:
- वजन: 5.8 टन
- डबल इंजिन असलेले हेलिकॉप्टर
- हवेतूनच हवेत मारक क्षेपणास्त्र, 20 एमएम बुर्ज गन आणि रॉकेट प्रणालीने सुसज्ज
- टँक, बंकर, ड्रोन आणि शत्रूच्या तळांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता
- रात्रीच्या वेळी देखील अचूक हल्ला करण्याची क्षमता
या महत्त्वपूर्ण संरक्षण करारामुळे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मोठी वाढ होणार असून, उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशा ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे देशाच्या संरक्षण दलांची ताकद अधिक प्रभावीपणे वाढण्यास मदत होणार आहे.