सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच, सीबीआयकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल

Sushant Singh Rajput | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन प्रकरणे सीबीआयने (CBI) बंद केली आहेत. सीबीआयने यासंदर्भातील क्लोजर रिपोर्ट मुंबईतील एका न्यायालयात सादर केला आहे.  या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारचा कट किंवा गुन्हेगारी षडयंत्राचा पुरावा आढळला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

सीबीआयकडून सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्ट सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तसेच, या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) देखील आरोप करण्यात आले होते. रिपोर्टनुसार, या प्रकरणात आता रियाला क्लिन चीट मिळाली आहे.

14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या बांद्रा येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मुंबईतील कूपर रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण अॅस्फिक्सिया (श्वास गुदमरल्याने) असल्याचे सांगण्यात आले होते.

सुशांत यांचे वडील के.के. सिंह यांनी पटना येथे एक एफआयआर दाखल केली होती, ज्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर काही व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे आरोप लावण्यात आले होते. सुशांतच्या वडीलांच्या आरोपावर रिया चक्रवर्तीने मुंबईत एक तक्रार दाखल केली होती, ज्यात सुशांत यांच्या बहिणींवर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता.

आता या प्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर करत सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे.  सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास 5 वर्षांनी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.