केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ; 1.15 कोटी जणांना मिळणार लाभ

DA hike 2025 | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांची वाढ (DA hike 2025) करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा थेट लाभ सुमारे 48.66 लाख सरकारी कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे, म्हणजेच एकूण 1.15 कोटी लोकांना याचा फायदा मिळेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या (DA) अतिरिक्त हप्त्यास मान्यता दिली आहे. यासोबतच निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई सवलतीत (DR) देखील वाढ करण्यात आली आहे. 

सध्या 53% दराने मिळणाऱ्या या भत्त्यात 2% वाढ झाल्यामुळे तो आता 55% झाला आहे. महागाईच्या वाढत्या दरामुळे कर्मचाऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 6,614.04 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

या सुधारणेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) आता 53% वरून 55% झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, आगामी 8 व्या वेतन आयोगाच्या घोषणेपूर्वीच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यापूर्वी, जुलै 2024 मध्ये देखील महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती, त्यावेळी तो 50% वरून 53% करण्यात आला होता. महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईच्या वाढत्या खर्चाशी जुळवून घेण्यासाठी वर्षातून दोन वेळा दिला जातो. हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या एका निश्चित टक्केवारीनुसार असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 1 लाख रुपये असेल, तर 2% वाढीनंतर त्याचा महागाई भत्ता 55% म्हणजेच 55,000 रुपये होईल.