मुंबई-पुण्याच्या विकासाला मिळणार बळ, ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

Greenfield Highway in Maharashtra | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील जेएनपीए बंदरापासून (पागोटे) चौकपर्यंत 6 पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग (Greenfield Highway in Maharashtra) बांधण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा 6 पदरी महामार्ग 29.219 किमी लांब आहे. हा प्रकल्प बीओटी या पद्धतीने राबवला जाईल.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 4500.62 कोटी रुपये खर्च होणार असून, यामुळे राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळेल.

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन (Gati Shakti National Master Plan) अंतर्गत बंदरांना रस्त्यांनी जोडणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. जेएनपीए बंदरातून होणारी कंटेनर वाहतूक सातत्याने वाढत आहे. शिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगामी विकासामुळे या परिसरात रस्ते जोडणी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन आणि पनवेल यांसारख्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे बंदरातून निघणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग-48 आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यास 2 ते 3 तास लागतात. 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai International Airport) सुरू झाल्यास ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग भविष्यात फायद्याचा ठरेल.

या प्रकल्पाद्वारे जेएनपीए बंदर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai-Pune Expressway) तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाशी (एनएच-66) जोडले जाईल. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 2 बोगदे खणले जातील, ज्यामुळे मोठ्या कंटेनर ट्रकांना घाटातून जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी, वाहतूक वेगवान आणि सुलभ होईल. हा 6 पदरी मार्ग बंदराची दळणवळण क्षमता वाढवेल, मालवाहतूक सुरक्षित करेल आणि मुंबई, पुणे तसेच आसपासच्या भागात आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

Share:

More Posts