Byju Raveendran Post | अडचणीत सापडलेल्या शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज स्टार्टअप बायजूचे (Byju’s) संस्थापक बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांनी कंपनीला पुन्हा नव्याने उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकेकाळी मोठ्या साम्राज्याचे स्वप्न पाहणाऱ्या बायजूला आता शून्यातून उभे करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
“मोडलो, पण खचलो नाही. आम्ही पुन्हा नक्कीच उभे राहू,” असे रवींद्रन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले. यासोबतच त्यांनी आपल्या तरुणपणीचा एक फोटो शेअर करत आपल्या साध्या पार्श्वभूमीची आठवण करून दिली.
Broke, not Broken. We will rise again. pic.twitter.com/dAekepwCtf
— Byju Raveendran (@ByjuofBYJUS) March 30, 2025
आर्थिक संकट आणि नियामक अडथळे
एकेकाळी 22 अब्ज डॉलरचे मूल्यांकन असलेल्या बायजूला सध्या रोख रकमेची कमतरता, गुंतवणूकदारांशी वाद आणि नियामक अडचणींमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अमेरिकेतील कर्जदारांशी असलेल्या 1 अब्ज डॉलरच्या थकबाकीच्या वादामुळे कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
जुन्या कर्मचाऱ्यांना संधी
“आम्ही लवकरच कंपनी पुन्हा सुरू करू – आणि मला विश्वास आहे की ते अपेक्षेपेक्षा लवकर होईल. तेव्हा आम्ही केवळ आमच्या माजी ‘बायजूइट्स’ मधूनच भरती करू,” असे रवींद्रन यांनी स्पष्ट केले. तसेच, “नंबर वन होण्यासाठी थोडे वेगळे असावे लागते,” असेही ते म्हणाले.
गेल्या 2 वर्षांतील घटनांवर भाष्य
रवींद्रन यांनी शुक्रवारी X वर पोस्ट करत कंपनीच्या प्रवासातील “सत्य” उघड करण्यास सुरुवात केली. “कोणतीही गोष्ट दिसते तितकी चांगली नसते आणि तितकी वाईटही नसते. सत्य नेहमीच या दरम्यान असते,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत “17 चांगली वर्षे, 2 वाईट आणि1 अत्यंत वाईट” असे वर्णन केले.
लाखो तरुणांना दिल्या संधी
रवींद्रन यांच्या मते, बायजूने गेल्या नऊ वर्षांत २ लाख १५ हजार नवोदितांना नोकऱ्या दिल्या. त्यांना कोणताही अनुभव नसताना, तरीही किमान ६ लाख रुपयांचे वार्षिक निश्चित वेतन देण्यात आले. “या नवोदितांनीच बायजू उभं केलं. त्यांच्याकडे शून्य अनुभव, पण असाधारण प्रतिभा आणि अमर्याद ऊर्जा होती. आज ते आपल्या अर्थव्यवस्थेचे उत्पादक सदस्य बनले आहेत,” असे रवींद्रन यांनी म्हटले.
संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न
सध्या आर्थिक संकटांनी ग्रासलेली बायजू कंपनी आता नव्याने उभारी घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या या निर्धारामुळे कंपनीच्या भविष्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.