भाजप आणखी किती वर्ष सत्तेत राहणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला, म्हणाले…

Amit Shah | भाजपच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे केंद्र सरकारमध्ये पुढील 30 वर्षे भाजपच (BJP) सत्तेत राहील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीत कोणत्याही पक्षाचा विजय त्याच्या कठोर परिश्रमावर अवलंबून असतो आणि जर तुम्ही स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी काम केले, तर विजय तुमचाच असतो, असे ते म्हणाले.

‘टाइम्स नाऊ समिट 2025’ मध्ये बोलताना शाह म्हणाले, “जेव्हा मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, तेव्हा मी म्हटले होते की भाजप पुढील 30 वर्षे सत्तेत राहील. आता फक्त 10 वर्षे झाली आहेत. चांगली कामगिरी करणार्‍या पक्षाला जनतेचा विश्वास मिळतो आणि जिंकण्याचा आत्मविश्वासही येतो. जे काम करत नाहीत, त्यांना हा आत्मविश्वास नसतो.”

समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code -UCC) विचारले असता, शाह म्हणाले की, भाजपशासित सर्व राज्ये टप्प्याटप्प्याने UCC लागू करतील, कारण भाजप स्थापनेपासूनच हा महत्त्वाचा अजेंडा आहे. उत्तराखंड सरकारने UCC लागू करण्यासाठी कायदा बनवला आहे. गुजरातनेही त्यासाठी समिती स्थापन केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा (Justice Varma) यांच्या निवासस्थानी सापडलेल्या कथित मोठ्या रकमेबाबत विचारले असता, शाह म्हणाले की, भारताच्या सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मोदी सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करतो का, या प्रश्नावर शाह म्हणाले, “संघाकडून कोणताही हस्तक्षेप झालेला नाही. RSS ने गेल्या 100 वर्षांपासून देशभक्त घडवले आहेत. देशभक्ती केंद्रस्थानी ठेवून अनेक आयाम एकत्र कसे ठेवायचे हे मी RSS कडून शिकलो आहे. हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.”

1991 च्या प्रार्थनास्थळ (विशेष तरतुदी) कायद्याबाबत विचारले असता, शाह म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ते यावर भाष्य करू इच्छित नाहीत. “सर्वोच्च न्यायालय योग्य आदेश देईल, याची मला खात्री आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे नक्कीच पालन करू,” असे ते म्हणाले.