चेतकची जादू! बजाज ऑटोच्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली, गुढीपाडव्याला रेकॉर्डब्रेक विक्री

Bajaj Auto Sets New Sales Record | गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) शुभमुहूर्तावर दुचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. एका आठवड्याच्या शेवटी (29 आणि 30 मार्च) कंपनीने तब्बल 26,938 वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये मोटरसायकल आणि लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक यांचा समावेश आहे. ‘वाहन’ डेटानुसार, ही विक्री कंपनीच्या मार्च महिन्यातील एकूण नोंदणीच्या जवळपास सहावा भाग आहे.  

महाराष्ट्रातही उच्चांक – विक्रीत 117 टक्क्यांची वाढ  

महाराष्ट्रातही बजाज ऑटोने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जबरदस्त विक्री केली. 29 आणि 30 मार्च रोजी कंपनीने 4,377 दुचाकी विकून नवा विक्रम प्रस्थापित केला. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा 117 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः इलेक्ट्रिक चेतक स्कूटरच्या विक्रीत मोठी उसळी दिसून आली असून, गेल्या वर्षीच्या 403 युनिट्सच्या तुलनेत यंदा 2,314 चेतक स्कूटर विकल्या गेल्या.  

देशभरात जोरदार विक्री  (Bajaj Auto Sales Record)

बजाज ऑटोने या वीकेंडमध्ये 19,017 बाइक्स विकल्या, ज्यामध्ये सीएनजी बाईकचाही समावेश आहे. याशिवाय, 6,570 इलेक्ट्रिक चेतक स्कूटरची विक्री केली. 

प्रीमियम सेगमेंटमध्ये बजाजची दमदार कामगिरी  

बजाजने केवळ स्वस्त आणि मिड-रेंज दुचाकींमध्येच नव्हे, तर प्रीमियम सेगमेंटमध्येही दमदार विक्री केली आहे. या कालावधीत कंपनीने 658 केटीएम आणि 693 ट्रायम्फ बाईक विकल्या. विशेष म्हणजे, नवीन लॉन्च झालेल्या चेतक 35 सिरीज (Chetak 35 series) स्कूटरला मोठी मागणी आहे.  

प्रीमियम चेतक 35 सिरीजने विक्रमी मागणी  

बजाजच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, या विक्रमी विक्रीचे श्रेय प्रीमियम चेतक 35 सिरीज स्कूटरला जात आहे. 1.30 ते 1.42 लाख रुपयांच्या किंमतीत ही स्कूटर लाँच करण्यात आली असून, या सेगमेंटमध्ये बजाजची बाजारातील पकड वाढण्याची अपेक्षा आहे.  

बजाजच्या मजबूत वितरण नेटवर्कचा मोठा फायदा  

बजाज ऑटोचे देशभरात 4,000 हून अधिक डीलर्स कार्यरत आहेत, तर महाराष्ट्रात 1,200 हून अधिक डीलर्स आहेत. यामुळेच कंपनीला गुढीपाडव्याच्या निमित्ताने इतकी मोठी विक्री साध्य करता आली. पुढील काही महिन्यांतही ही वाढ कायम राहील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.