अमिताभ बच्चन ठरले सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रेटी, शाहरूख-सलमानही टाकले मागे

Amitabh Bachchan tops India’s Taxpayer List | 81 वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नवा विक्रम केला आहे. मात्र, हा विक्रम चित्रपटाच्या कमाईबद्दल नाही तर कराबाबत आहे. अमिताभ बच्चन हे 2024-25 आर्थिक वर्षात भारतातील सर्वाधिक कर (India’s Taxpayer List) भरणारे सेलिब्रिटी बनले आहेत.

बच्चन यांची या आर्थिक वर्षात एकूण कमाई 350 कोटी रुपये होती. या कमाईवर त्यांनी जवळपास 120 कोटी रुपये कर भरला आहे. कर भरण्याच्याबाबतीत त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खानलाही मागे टाकले आहे.

बिग बींची कमाई चित्रपट, जाहिरात आणि गेल्या दोन दशकांपासून ते होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नातून झाली आहे. गेल्या वर्षी त्यांनी 71 कोटी रुपयांचा कर भरला होता. मात्र, यावेळी हा आकडा 120 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, यंदा कराच्या रकमेतील 69 टक्के वाढ झाली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपली 52.5 कोटी रुपयांची आगाऊ कराची रक्कम 15 मार्च 2025 रोजी भरली. गेल्या वर्षी शाहरुख खान 92 कोटी रुपयांचा कर भरत सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी होते. मात्र यंदा बिग बींनी शाहरुखला मागे टाकत चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. या यादीत तामिळ सुपरस्टार थलपती विजय (80 कोटी रुपये) आणि सलमान खान 75 कोटी रुपयांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

दरम्यान, बिग बींच्या कामाबद्दल सांगायचे तर ‘कल्कि 2898एडी’, ‘वेट्टेयन’ या चित्रपटात शेवटचे प्रमुख भूमिकेत दिसले होते. तसेच, ‘कौन बनेगा करोड़पति 16’ शो देखील ते होस्ट करणार आहेत.