Adolescence Web Series | लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर (Netflix) याच महिन्यात 13 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘Adolescence’ या वेबसीरिजने जोरदार यश मिळवले आहे. 4 भागांची ही सीरिज रिलीज झाल्यावर काही दिवसातच प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
स्टीफन ग्राहम (Stephen Graham), ओवेन कूपर (Owen Cooper) आणि एरिन डोहर्टी (Erin Doherty) यांच्या महत्वाच्या भूमिका असलेल्या या सीरिजने आता नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका बनण्याचा विक्रम केला आहे. ‘Adolescence’ ला फक्त 11दिवसांत तब्बल 6 कोटी 63 लाख वेळा पाहिलं गेलं आहे.
या सीरिजने पहिल्या आठवड्यात 2 कोटी 43लाख व्ह्यूज मिळवले आणि जगभरात पहिल्या क्रमांकावर येत सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका म्हणून ओळख मिळवली. दुसरा आठवडा तर या सीरिजसाठी आणखीच फायद्याचा ठरला, कारण त्या आठवड्यात जवळपास दुप्पट म्हणजे 4 कोटी 20लाख लोकांनी तिला पाहिलं. यामुळे दोन आठवड्यांत या सीरिजला एकूण 6 कोटी 63लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
फक्त 11दिवसांत इतके व्ह्यूज मिळवणारी ही पहिलीच मर्यादित मालिका ठरली आहे आणि याआधी कोणत्याही मर्यादित मालिकेने इतका मोठा आकडा गाठलेला नाही. यापूर्वी ‘The Residence’ ही मालिका 64लाख व्ह्यूजसह दुसऱ्या क्रमांकावर होती.
काय आहे या मालिकेत?
‘Adolescence’ या सीरिजमधील प्रत्येक भाग एकाच शॉटमध्ये (ब्रेक न घेता) शूट करण्यात आला आहे. याची कथा 13वर्षांच्या जेमी मिलर (ओवेन कूपर) नावाच्या एका शाळेतल्या मुलाभोवती फिरते, ज्याला त्याच्या शाळेतील एका तरुणीच्या खुनाच्या आरोपात अटक होते.या घटनेचा त्या मुलावर व कुटुंबावर कसा परिणाम होतो, हे या सीरिजमध्ये पाहायला मिळते.