70 वर्षांनंतर मराठी खेळाडूला यश स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक

कोल्हापूर – कांबळवाडी गावच्या स्वप्निल कुसाळेने आज इतिहास रचला. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. 70 वर्षांपूर्वी खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक गाजवल्यावर एका मराठी खेळाडूने पदक जिंकले आहे.
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील भारताचे हे तिसरे पदक ठरले. मनू भाकर व सरबज्योत नंतर नेमबाजीत पदक पटकावणारा स्वप्नील तिसरा भारतीय खेळाडू ठरला. रेल्वेत नोकरी करून नेमबाजीचा खडतर सराव करणार्‍या स्वप्निलने 2008 मध्ये त्याचा आवडता खेळाडू अभिनव बिंद्राला टीव्हीवर ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी 12 वीच्या परीक्षेला दांडी मारली होती. खेळावरील त्याच्या याच प्रेमाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्याला किमयागार बनवले. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदक जिंकल्यानंतर तब्बल 70 वर्षांनी कोल्हापूरचाच एक मराठी माणूस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेता ठरला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांनी त्याचे
अभिनंदन केले.
स्वप्निलने रायफल थ्री पोझिशनमध्ये काल सटीक निशाणा लावून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत नीलिंग पोझिशन (गुडघे टेकून), प्रोन पोझिशन (पोटावर झोपून)आणि स्टँडींग पोझिशन (उभे राहून) यांचा समावेश असतो. नीलिंग आणि प्रोनपर्यंत स्वप्निल पिछाडीवर होता. मात्र, त्याने स्टँडींग पोझिशनमधून अप्रतिम पुनरागमन करत पदकाला गवसणी घातली. त्याने नीलिंग पोझिशनमध्ये 153.3 गुण मिळवले होते. यानंतर प्रोन पोझिशनमध्ये त्याचा एकूण स्कोर 310.1 झाला. नीलिंग आणि प्रोन पोझिशननंतर स्टँडींग पोझिशनमधील दोन शॉट खेळले गेले. यानंतर बाद फेरी सुरू झाली. स्वप्निल नीलिंग आणि प्रोन पोझिशननंतर सहाव्या स्थानावर राहिला होता. मात्र, बाद फेरी सुरू होताच स्वप्निल आधी पाचव्या आणि नंतर तिसर्‍या स्थानावर पोहोचला. संपूर्ण बाद फेरीत स्वप्निल तिसरा राहिला. त्याच्यात आणि दुसर्‍या स्थानावरील युक्रेनच्या नेमबाजाच्या गुणामध्ये केवळ 0.5 गुणांचा फरक राहिला. त्यामुळे त्याचे रौप्यपदक हुकले. मात्र कांस्यपदक पटकावून त्याने भारतीयांची मने जिंकली. स्वप्निलचा अंतिम स्कोअर 451.4 राहिला. चीनच्या युकुन लिऊने 463.6 गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला, तर युक्रेनच्या सेरहीने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले. स्वप्निलने अप्रतिम लवचिकपणाचे कौशल्य दाखवून विजय मिळवला त्याबद्दल अभिनंदन असे पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्र सरकारकडून स्वप्निलला 1 कोटीचे बक्षीस जाहीर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात देशाला कांस्यपदक मिळवून देणारा कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेला महाराष्ट्र सरकारने 1 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top