Kailash Mansarovar Yatra: जून 202 मध्ये गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. तसेच, कैलास मानसरोवर यात्राही थांबवण्यात आली होती. मात्र, आता दोन्ही देशातील विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. तसेच, पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे.
दोन्ही देशांकडून संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 26-27 जानेवारी रोजी बीजिंग दौरा केला. यावेळी भारत आणि चीनमध्ये परराष्ट्र सचिव-उप परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील 5 वर्षांपासून ही यात्रा बंद आहे. मात्र, आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली. तसेच, दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवाही पुन्हा सुरू होणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, भारत आणि चीनदरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास दोन्ही देशांमध्ये तत्त्वतः सहमती झाली आहे. यासाठी दोन्ही देशांचे संबंधित अधिकारी लवकरच बैठक घेऊन चर्चेच्या माध्यमातून रूपरेषा निश्चित करतील. तसेच, यावर्षी उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.