5 लाख महिलांना लाडकी बहिणी योजनेतून वगळले, दिलेले पैसे परत घेणार का? वाचा

Ladki Bahin Yojana: महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्यावर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंर्गत दरमहिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातात. तर एप्रिलपासून ही रक्कम 2100 रुपये होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

निवडणुकीपूर्वी कोणत्याही अर्जाची छाननी न करता सर्रासपणे महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. मात्र, आता अर्जाची छाननी करत अनेक महिलांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक महिला पात्र नसतानाही त्यांच्या बँक खात्यात कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत, 21 ते 65 वयोगटातीलतील महिलांना, ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना महिना 1500 रुपयांची मदत दिली जाते. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन नाही व कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नाहीत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, अनेक महिलांनी पात्र नसतानाही अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत या महिलांच्या खात्यात एकूण 450 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम परत घेतली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या महिला अपात्र आहेत, त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. 

ज्या 5 लाख महिलांपैकी अपात्र ठरल्या आहेत, त्यातील दीड लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक होते, तर 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहन आहे किंवा त्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.