Harmful diet trends | आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी विविध डाएट ट्रेंड भारतीयांमध्ये लोकप्रिय होत आहेत. मात्र, काही डाएट सुरुवातीला फायदेशीर वाटले तरी दीर्घकाळात आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. चयापचय आणि पोषणाची समज न घेता हे ट्रेंड फॉलो केल्याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. असे कोणते डाएट ट्रेंड आहेत, त्याविषयी समजून घेऊयात.
कमी कर्बोदकयुक्त डाएट (Keto diet)
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक भारतीय केटो डाएटसारख्या कमी कर्बोदकयुक्त आहाराचा अवलंब करत आहेत. पारंपरिक भारतीय आहारात धान्य, डाळी आणि भाज्यांचा समावेश असतो, जे महत्त्वाचे पोषक घटक पुरवतात. मात्र, हे घटक टाळल्याने फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच, जास्त प्रमाणात तूप, लोणी आणि चीज घेतल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
उच्च प्रथिने आणि सप्लिमेंट डाएट
फिटनेस प्रेमींमध्ये जास्त प्रथिनेयुक्त आहार आणि सप्लिमेंट्स घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, जास्त प्रथिने घेतल्याने मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो आणि अन्नातून मिळणाऱ्या नैसर्गिक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. तसेच, प्रोटीन पावडर आणि सप्लिमेंट्समध्ये असलेल्या कृत्रिम घटकांमुळे पचनसंस्था बिघडू शकते.
लिक्विड आणि डिटॉक्स डाएट
ज्यूस क्लींज, सूप डाएट आणि डिटॉक्स (Detox diet risks) प्रोग्राम वजन झटपट कमी करण्यासाठी लोकप्रिय झाले आहेत. मात्र, यामध्ये आवश्यक प्रथिने आणि फॅटी ऍसिड नसल्याने स्नायू कमकुवत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. लिक्विड डाएटमुळे चयापचय मंदावतो आणि शरीर उपासमारीच्या स्थितीत जाते. त्यामुळे वजन टिकवणे कठीण होते आणि पाणी कमी झाल्यामुळे वजन कमी झाल्या दिसते. परंतु, पुन्हा आहार घेण्यास सुरुवात केल्यावर वजन वाढते.
संतुलित आहार हा सर्वोत्तम उपाय (Healthy eating advice)
डाएट ट्रेंडच्या अतिरेकाऐवजी, संतुलित आहारावर भर द्यावा. जटिल कर्बोदकं, आणि योग्य प्रमाणात प्रथिने यांचा समावेश असलेला आहार सर्वोत्तम आहे. पारंपरिक भारतीय सुपरफूड्स जसे की डाळ, दही, नट्स आणि बिया यांचा समतोल आहारासाठी उपयोग करावा. कोणतेही अन्न गट पूर्णपणे वगळण्याऐवजी संतुलित आणि पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करणेच योग्य ठरेल.