शेतकर्‍यांचा पुन्हा एल्गार! दिल्ली सीमेवर ठिय्या
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी चलो दिल्ली असा नारा देत आज दुपारी लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर जमा झाले. पोलिसांनी त्यांना नॉईडा येथील दलीत प्रेरणास्थळ येथेच अडविले. त्यांच्या मागण्यांवर सात दिवसांत चर्चा होईल असे त्यांना आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही शेतकरी हटले नाहीत. त्यांनी चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत पुढील सात दिवस सीमेवर ठिय्या देऊन बसण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांनी यापूर्वी प्रदीर्घ आंदोलने केली आहेत. मात्र सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नसताना हरियाणाच्या जनतेने भाजपाला विधानसभेत दणदणीत यशस्वी केले. त्यामुळे या आंदोलनाबद्दल शंका निर्माण होऊ लागली आहे.
आज शेतकर्‍यांना अडविल्यावर शेतकरी व पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी रस्त्यावर मोठे कंटेनर आणून शेतकर्‍यांचा मार्ग रोखला. तरीही शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्यावर ठाम होते, अनेक ठिकाणी रस्त्यावरील अडथळे मोडून काढत ते पुढे गेले. पोलिसांनी त्यांना पुन्हा रोखले. तेव्हा कोणत्याही स्थितीत दिल्लीत जाण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला. अखेर त्यांना नॉयडा येथे थांबवण्यात आले.
उत्तर प्रदेशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नॉयडा येथे आंदोलन करत होते. भूखंडाची नुकसान भरपाई, नव्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार अधिग्रहित जमिनीला दर मिळावा, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगार व पुर्नविकास आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु होते. या संदर्भात काल प्रशासन व पोलिसांनी शेतकर्‍यांबरोबर चर्चा केली. त्यावर समाधान न निघाल्याने शेतकर्‍यांनी आज चलो दिल्लीचा नारा दिला. सकाळपासूनच शेतकरी दिल्लीला जाण्याच्या तयारीत चिल्ला सीमेवर गोळा होऊ लागले. त्याने नॉयडात मोठी वाहतूक कोंडी झाली. चिल्ला सीमा व डीएडी फ्लाईवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी दिल्लीकडे येणारे अनेक मार्ग बदलले. शेतकरी छुप्या पद्धतीने दिल्लीत येऊ नये यासाठी गाड्यांची तपासणी करण्यात आली. काही शेतकरी नेत्यांना नजरकैदही
करण्यात आली.
तरीही उत्तर प्रदेशातील 9 जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आले होते. त्यांना दलित प्रेरणास्थळ या ठिकाणी थाबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर विचारविनिमय सुरु असून शेतकर्‍यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करावे व सर्वसामान्य दिल्लीकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. दिल्लीत येणार्‍या शेतकर्‍यांना नेहमी रोखले जाते. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने शेतकर्‍यांना दिल्लीत येण्यास मनाई
केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top