माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून 28 जून 2024 या दिवशी त्याचा शासन निर्णय जारी केला. ही योजना महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्‍ता आणि निराधार महिलांसाठीच आहे.

पात्रता
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सदर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असता कामा नये. किमान वय 21 पूर्ण व कमाल 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल, सदर महिलेचे सक्षम बँक खाते असणे आवश्यक आहे.

अपात्रतेचे निकष
ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, तिच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतो, तिच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून केंद्रीय अथवा राज्य सरकारच्या कोणत्याही कार्यालयात काम करतो किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, सदर महिलेने शासनाच्या इतर योजनेतील दीड हजारपेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतला आहे, जी महिला विद्यमान किंवा माजी आमदार-खासदाराच्या कुटुंबातील आहे, ज्या महिलेच्याकुटुंबातील सदस्य हा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड अथवा उपक्रमात पदावर नियुक्त आहे, जिच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, जिच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) अशा महिलांना ही योजना लागू होत नाही.

निवड कशी होणार
अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्यसेविका, सेतू सुविधाकेंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी हे पात्रता आहे का याची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणीत केल्यानंतर सदर महिलेचा अर्ज सक्षम अधिकार्‍याकडे सादर केला जाईल. या अर्जाची पडताळणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी करेल आणि अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती देईल. या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल अ‍ॅप, सेतू सुविधा केंद्र येथून ऑनलाईन भरता येतील. ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तिच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज सादर कऱण्याची सुविधा राहील. तिथे अर्जाची पोचपावती देण्यात येईल. अर्ज भरणे विनामूल्य आहे. अर्ज भरताना महिलेने सदर ठिकाणी स्वत: उपस्थित असणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर पात्र अर्जदारांची यादी पोर्टल, अ‍ॅपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत आणि वॉर्ड स्तरावर असलेल्या सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीबाबत आक्षेप असल्यास तक्रार नोंदवता येणार आहे. त्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे. जी महिला पात्र ठरेल तिची रुपये दीड हजार ही रक्कम दर महिन्याला थेट खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेसाठी वेबपोर्टल व मोबाईल अ‍ॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व काम महिला व बालविकास खाते यांच्या अंतर्गत होणार आहे. सध्या या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आहेत. या योजनेसाठी महिला व बालविकास आयुक्त, पुणे हे नियंत्रण अधिकारी असतील आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त नवी मुंबई हे सह नियंत्रण अधिकारी असतील.

अर्ज करण्याची मुदत
1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या पंधरा दिवसांतच अर्ज भरता येणार आहेत. 16 जुलै रोजी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी प्रकाशित होईल. 16 जुलै ते 20 जुलै या यादीबाबत ज्यांच्या तक्रारी हरकती असतील त्या स्वीकारल्या जातील. 21 ते 30 जुलै तक्रार हरकतींबाबत निर्णय घेण्यात येईल. 1 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांची अंतिम यादी प्रकाशित होईल. 10 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँकेमध्ये ई-केवायसी करायचे आहे. 14 ऑगस्ट रोजी महिलेच्या खात्यात दीड हजार रुपये रक्कम जमा होतील. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत अशा तर्‍हेने सदर महिला 60 वर्षांची होईपर्यंत दीड हजार रुपये रक्कम खात्यात मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top