2029 ला फक्त भाजपा! अमित शहांची घोषणा एकनाथ शिंदे-अजित पवारांना हाकलणार

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत दादरमध्ये भाजपा पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडला. यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्पष्टच म्हटले की, यावेळी 2024 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु पुढील विधानसभेला 2029 मध्ये केवळ भाजपाचे एकट्याचेच सरकार येणार आहे. याचा अर्थ पुढील पाच वर्षांत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी असलेली युती भाजपा तोडणार असून, दोन्ही मित्रपक्षांना हाकलून देणार आहे. शहा यांच्या या वाक्याने महायुतीत खळबळ माजली आहे.
राज्यात भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महायुतीचे सरकार असले तरी तिन्ही पक्षात फारसे सख्य नाही. गेले काही दिवस त्यांच्यातील कुरबुरी वाढल्या आहेत. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला का घेतले, असा प्रश्न भाजपा-शिवसेनेचे नेते जाहीरपणे विचारत आहेत. त्यातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला वेगळे पाडण्याचेही प्रकार होत आहेत. एकट्याच्या जीवावर सत्ता मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न भाजपा नेते जाहीरपणे बोलत असताना अमित शहा यांनी आज केलेल्या वक्तव्यावरून भविष्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज बांधला जात आहे.
दादरच्या योगी सभागृहात झालेल्या या संवाद मेळाव्याला भाजपाचे अडीच हजार पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना भाषणाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड न करण्याची सूचना दिली. ते म्हणाले की, जे सरकार काम करते तेच निवडणूक जिंकते. मागील 60 वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाला सलग 3 वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. मी माझ्या अनुभवाने सांगतो की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची ‘दिशा आणि दशा’ बदलेल. तेव्हा आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. जोमात काम करा. मी सांगतो की, यंदा महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपाच्या जीवावर सरकार आणायचे आहे.
अमित शहा असेही म्हणाले की, मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. 10 टक्के मतदान वाढवा. सरकार आपले आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदार विरोधात असलेली नाराजी दूर करा. बूथवर आपल्याला 10 कार्यकर्ते पाहिजेत. दसर्‍यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरत राहतील. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर किमान 20 लोकांना भाजपाचे सदस्य करा. सदस्य करताना मते मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल. अमित शहा यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत किती निवडणुका जिंकल्या? एखाद्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला 85 टक्के गुण मिळाले, पण नेहमी 20 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्याला 30 टक्के गुण मिळाले, तर तो विद्यार्थी गावभर मिठाई वाटतो. राहुल गांधी असा मूर्खपणा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल्या 2 जागा असतानाही आपला एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नव्हता. हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे. 1980 च्या दशकातील सर्वच कार्यकर्त्यांना आपला पराभव होणार हे माहिती होते. पण त्याची त्यांना कोणतीही तमा नव्हती. आपण राजकारणात पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही पदासाठी नव्हे तर महान भारत बनवण्यासाठी आलोत, अशी त्यांची भावना होती. सरकार येते आणि जाते. आपले सरकार 10 वर्षे चालले, पण आपण आपला विचार केव्हाच सोडला नाही.

उद्धव ठाकरेंच्या सभेत हिरवे झेंडे नाचतात
भाजपा पदाधिकार्‍यांच्या या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपला आहे. मराठी व हिंदू मते त्यांना मिळत नाहीत. त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचतात. आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका, गाफील राहू नका. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. मात्र अतिआत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका. राज्यातील 3 कोटींपेक्षा जास्त जनता सरकारी योजनांचा लाभ घेत आहे. त्यांची मते आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top