मुंबई – विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर चढला आहे. महाविकास आघाडीला मात देण्यासाठी आणि सत्ता राखण्यासाठी महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योजना आखण्यात आली आहे. 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात शंखनाद करून आणि देवीचे दर्शन घेऊन महायुती प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यानंतर महायुती राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. त्याच दिवशी राहुल गांधी यांचा मविआसाठी मुंबईचा दौरा आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असा चंग महायुतीने बांधला आहे. एका बाजूला जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नसताना दुसर्या बाजूला आपापल्या पक्षांच्या आणि एकत्र बैठकांचे सत्रही महायुतीत सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा समन्वय समितीसोबत बैठक घेतली. यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली असल्याचे समजते. या रणनीतीनुसार 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आणि देवीसमोर शंखनाद करून जाहीर सभेने महायुतीचा प्रचार सुरू होणार आहे. त्यानंतर कोल्हापुरातून संवाद यात्रेला सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांत ती जाणार आहे. या संवाद यात्रेची सांगता मुंबईत होईल. एका दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होईल. या संवाद यात्रेचा कालावधी कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे. या यात्रेव्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभा, सामूहिक सभा, मेळावे यांचेही आयोजन केले जाणार आहे. राज्यातील 7 विभागांतील 288 विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी महायुतीतील सर्व घटक पक्ष मतदारांशी संवाद यात्रा, लाभार्थी यात्रा आणि सभा आयोजित करतील.
महायुतीच्या प्रचारामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ हा असणार आहे. या योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतरही महायुती आपल्या प्रचारात याच योजनेवर प्रामुख्याने भर देणार देणार असून, महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला षण्मुखानंद हॉल येथे होणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि मविआचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच सभेतून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. 20 ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीत सभा पार पडणार आहे. आजपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आहे, तर काँग्रेस नेते मराठवाड्याच्या दौर्यावर असून प्रभारी रमेश चेन्नीथला हेही उपस्थित असणार आहेत.
अमित शहा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौर्यावर
महायुतीचा विधानसभेचा प्रचार सुरू होण्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार आहेत. 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी हा दौरा होणार असून, त्यात ते राज्यातील विदर्भ, मराठवाड्याच्या 6 विभागांत जाणार आहेत. या दौर्यावेळी शहा भाजप पदाधिकार्यांशी चर्चा करणार आहेत.