20 आमदारांचा पाठिंबा! नवा उदय होणार! शिंदेंचे जाणे अटळ? पुन्हा फुटीचा घाव?

मुंबई- पालकमंत्रिपदाच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांतील खदखद उफाळून आली आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला अवघ्या 24 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक परिषदेसाठी दावोसमध्ये असताना हा निर्णय झाला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला घेऊन न जाता उद्योगमंत्री उदय सामंत यांना नेले आहे. दावोसमधून महाराष्ट्राच्या राजकारणातील सूत्रे हलवली जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या दरे गावी निघून गेले. यामुळे महायुतीत सगळे काही आलबेल नाही, अशी चर्चा पुन्हा एकदा झाली. या घडामोडी घडत असताना विरोधकांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला की, उदय सामंत यांच्या मागे 20 आमदार आहेत. त्यामुळे सतत वेगवेगळ्या मागण्या करीत हट्ट करणारे शिंदे यांना दूर लोटून लवकरच नवीन ’उदय’ होईल.
पालकमंत्रिपदाच्या वाटपात रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्या वाट्याला येताच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या समर्थकांनी आंदोलन करून मुंबई-गोवा महामार्ग बंद पाडला. रायगडमधील कर्जत-खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही, असा थेट इशारा दिला. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचे दुसरे मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनीही नाराजी दर्शवली होती. महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच पालकमंत्रिपदाच्या नावावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब झाले असे सांगण्यात येत असले तरीही नाराजीचा तीव्र सूर उमटला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 24 तासांत आपला निर्णय फिरवून रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेले. यापूर्वी महायुतीचे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्रिपदावरून आणि नंतर खातेवाटपावेळी गृहमंत्रिपदावरून नाराज होऊन ते असेच दरेला निघून गेले होते. आता त्यांची समजूत काढायला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरे गावाला जाणार आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे यावेळीही ते नाराज आहेत, हे लपून राहिलेले नाही.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाराजी दाखवून आपल्या पदरात काही मिळेल का, यासाठी शिंदेंचा हा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे यांची गरज संपल्याने त्यांनी बाजूला व्हावे, असे प्रयत्न सुरू आहेत. उद्धवजींना संपवून शिंदेंना आणले, आता शिंदेंना संपवून नवीन ’उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल? त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. असे शिवसेनेच्या बाबतीत घडेल ही सध्याची परिस्थिती आहे. उद्या शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल. काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहेत. ते उद्याच्या उदयासाठीच आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदेंवर टोलेबाजी केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे कारण कळले पाहिजे. लहान मुलाने रुसावे आणि कोपऱ्यात जाऊन बसावे, तसे ते गावी जातात. एकनाथ शिंदेंचे दरे हे त्यांचे दावोस आहे. तिथे जाऊन ते पक्षात, कुटुंबात आणि कार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात. एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ असतात. त्यांनी आता नागा साधूंबरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला हवे. नागासाधूही अस्वस्थ असतात. अघोरी विद्या करतात, नाचतात, तंबूत बसतात. कोणी आयआयटीवाला बाबा आहे, तसा कोणी दरेवाला बाबा असेल. पण तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळ्यात ध्यानधारणा करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रिपदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले. त्यामुळे ते टळले.
दरेमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत या बातम्या पोहोचल्यावर त्यांनी सावध होऊन पत्रकारांशी खास संवाद साधत म्हटले की मी माझ्या गावी आलो की माझ्या नाराजीची चर्चा सुरू होते. परंतु मी नवीन महाबळेश्वरच्या प्रकल्पासाठी इथे आलो आहे. मला यानंतरही अनेकदा इथे यावे लागणार आहे, एवढा मोठा हा प्रकल्प आहे. एखाद्याने पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगे काहीच नाही. नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच मार्ग निघेल.
तर दावोसमध्ये असलेले उदय सामंत वडेट्टीवारांना उत्तर देत म्हणाले की, मी कधीही कुणावर वैयक्तिक टीका करत नाही. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संपविण्यासाठी असे षडयंत्र कुणी रचू नये. एकनाथ शिंदे, मी आणि तुम्हीही (वडेट्टीवार) सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाला आहात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली दोन लोक एकत्र असतील तर त्यांना वेगळे करण्याचे षडयंत्र तुम्ही करू नका. तुम्हीदेखील भाजपामध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. मी खाजगी बाबी उघड करत नाही म्हणून अद्याप त्यावर बोललो नाही . संजय राऊत यांनीही माझ्याबद्दल केलेले विधान ऐकले. त्यांचे विधान राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योगमंत्रिपद मिळाले. याची मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडविण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे कुणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. बीड ऐवजी जालनाचे पालकमंत्रिपद मिळालेल्या पंकजा मुंडे यांनीही बीडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, मी बीडची लेक आहे. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. पण आता जो निर्णय घेतला आहे त्यात जास्तीत जास्त काम करण्याच्या भूमिकेत मी असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top