नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या केशव कुंज या आलिशान मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या संकुलाच्या नूतनीकरणावर 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा निधी लोकवर्गणीतून गोळा करण्यात आला. दिल्लीतील झंडेवाला परिसरात 5 लाख चौरस फूट जमिनीवरील या मुख्यालय संकुलात प्रशस्त सभागृहे, वाचनालय, अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधांनी युक्त असे रुग्णालय आदि सुविधा आहेत. मारुतीचे मंदिरही आहे.
रा. स्व. संघाचा सातत्याने होत असलेला विस्तार पाहता केशव कुंजमध्ये प्रशिक्षण शिबिरे, बैठका आणि संशोधन कार्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. केशव कुंज मधील वाचनालयाचा उपयोग कार्यकर्त्यांना संशोधन करण्यासाठी होणार आहे. प्रशस्त सभागृहांमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांना सामावून घेता येणार आहे. केशव कुंजमधील रुग्णालयात पाच खाटांची व्यवस्था आहे. साधना, प्रेरणा आणि अर्चना अशा तीन इमारती आहेत. या इमारतींमध्ये एकूण 300 खोल्या आहेत. त्यांचा वापर संघाच्या स्वयंसेवकांना कार्यालय, सभागृह म्हणून करता येणार आहे.