दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (Indian Army Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याच्या असाधारण शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवसात पाळला जातो. भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या तीन महत्त्वाच्या युद्धनौका देशाला समर्पित करण्यात आल्या. आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले.
15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन (Indian Army Day) का साजरा केला जातो व या दिवसाचे विशेष महत्त्व का आहे? याविषयी जाणून घेऊया.
भारतीय सैन्य दिनाचे महत्त्व
15 जानेवारीचा दिवस भारतासाठी अत्यंत खास आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सैन्य दिन (Indian Army Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस त्या सैनिकांच्या सन्मानाचे प्रतीक आहे, जे आपल्या सीमांचे रक्षण करतात. यावर्षी भारत 77 वा सैन्य दिन साजरा करत आहे.
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय सैन्याचे नेतृत्व ब्रिटिश कमांडरकडे होते. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतरही भारतीय सैन्यप्रमुख ब्रिटिश वंशाचा होता. पण 15 जानेवारी 1949 रोजी हा इतिहास बदलला. या दिवशी लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सैन्यप्रमुख बनले. त्यामुळे याच दिवशी भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो. करियप्पा 1953 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले आणि नंतर 1986 मध्ये त्यांना फील्ड मार्शल हा मानद दर्जा प्रदान करण्यात आला.
भारतीय सैन्य दिनाची या वर्षीची थीम
यावर्षी ‘समर्थ भारत, सक्षम सेना’ या थीमसह सैन्य दिन (Indian Army Day) साजरा केला जात आहे. याचा अर्थ आहे की प्रत्येक क्षेत्रात समर्थ असलेल्या आपल्या देशाची सेना कोणत्याही कठीण परिस्थितीसाठी सक्षम आहे.