15 पथके तयार करूनही सैफचा हल्लेखोर सापडेना

मुंबई – सिनेअभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करणार्‍या हल्लेखोराचा शोध आजही लागला नाही. मुंबई पोलिसांनी आज एका संशयिताला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्याच्या चौकशीनंतर तो हल्लेखोर नाही असे सांगितले जाऊ लागले. मग आणखी एकाला अटक केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे हल्लेखोर कोण या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले नाहीच. सैफवरील हल्लेखोराला पकडण्यासाठी 15 हून अधिक टीम तयार करूनही मुंबई पोलिसांना हल्लेखोराला शोधण्यात अपयश आले.
सैफची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली. त्याला खासगी रूममध्ये हलविण्यात आले आहे. त्याला भेटायला आजही कलाकारांची रीघ लागली होती. सैफवर हल्ला करणारा इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. या हल्लेखोराचे इमारतीचा जिना उतरतानाचे व चढतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी शाहीद नावाच्या संशयिताला ताडदेवच्या फॉकलँड रोड येथून ताब्यात घेतले. तो सैफच्या घरी लादीचे काम करणार्‍या कामगारांपैकी एक आहे. त्याची वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. परंतु तो सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी नाही हे चौकशीतून स्पष्ट झाले. या आरोपीबरोबर त्याची पत्नी आणि मुलगाही पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी शाहीदवर होत असलेले आरोप फेटाळले. ते म्हणाले की, शाहीद सुतार असून तो अनेक वर्षे हे काम करतो आहे. तो कालच सैफच्या घरी काम करायला गेला होता. त्याचा या हल्ल्याशी संबंध नाही. पोलिसांनी त्याला फक्त चौकशीसाठी बोलावले होते. त्याला अटक केलेली नाही. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती शाहीद नाही.
याप्रकरणी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, ज्याचा चेहरा संशयित हल्लेखोराशी मिळताजुळता आहे. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही. शाहरुख खान याच्या घराची रेकी केली गेली, अशा ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्याबद्दल कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.
हल्लेखोर सैफच्या घरात नक्की कसा घुसला, सैफच्या घरातीलच कुणी त्याला मदत केली का, निव्वळ चोरी हाच त्याचा उद्देश होता का, असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित राहिले. सैफच्या घरातील कर्मचारी व त्याच्या घरी कामाला येणारे मजूर या सगळ्यांची चौकशी सुरु आहे. या परिसरातील इतर कामगारांचीही चौकशी सुरु आहे, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. परंतु पोलिसांनी त्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही.
हल्ल्यात सैफच्या मणक्याजवळ अडकलेला अडीच इंचाचा चाकूच्या तुकड्याचा फोटो आज व्हायरल झाला होता. त्यामुळे सैफची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जात होते. सैफवर शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. डॉ. नितीन डांगे म्हणाले की, अभिनेता सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्याची प्रकृती आता बरी आहे. दुखणे कमी झाले असून, त्याला सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आज त्याला अतिदक्षता विभागातून विशेष विभागात हलवले. आम्ही त्याला आज कुणालाही न भेटण्याचा सल्ला दिला आहे. कारण जखमा ताज्या असून त्यांना संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. पुढील आठवडाभर त्याला जास्तीत जास्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याच्या मणक्याला थोडी दुखापत झाली होती. हल्लेखोराने केलेला चाकूचा वार दोन मिलिमीटर खोल गेला असता तर मोठी दुखापत झाली असती. आम्ही शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला. सैफला रुग्णालयात घेऊन जाणारा रिक्षाचालक आज माध्यमांसमोर आला. रिक्षा चालक भजनलाल शर्मा म्हणाले की एक महिला रिक्षा थांबवत होती, ती तणावात होती. नंतर सैफला आणले. तो रक्तबंबाळ होता. त्याच्या बरोबर त्याचा मुलगा तैमूर होता आणि एक तरूण मुलगा होता. त्याला पाच मिनिटात रुग्णालयात नेले. तिथे उतरल्यावर ते म्हणाले की मी सैफ आहे, लवकर स्ट्रेचर आणा. तेव्हा मला तो सैफ आहे हे कळले. मी त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top