14 वर्षांच्या मुलाची कमाल, बनवले हार्टअटॅकचा धोका ओळखणारे ‘हे’ खास अ‍ॅप 

हार्टअटॅकच्या घटनांमध्ये गेल्याकाही वर्षात मोठी वाढ झाली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींना या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहेत. मात्र, हार्टअटॅक येण्याआधीच याबाबत माहिती मिळाली तर? यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आता ही गोष्टी साध्य झाली आहे. 

14 वर्षीय अनिवासी भारतीय विद्यार्थी सिद्धार्थ नंद्याला (Siddharth Nandyala) याने असेच एक खास अ‍ॅप तयार केले आहे.  डॅलस येथे राहणाऱ्या या विद्यार्थ्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने एक अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे, जे 96 टक्क्यांहून अधिक अचूकतेने हार्टअटॅकचा ओळखू शकते, असा त्याचा दावा आहे.  

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ भारत दौऱ्यावर आला असताना त्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्याशी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थच्या या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सर्केडियन AI (CircadiaV) हे स्मार्टफोनवर आधारित हृदयाच्या ध्वनींच्या नोंदींच्या मदतीने हार्टअटॅकचे लवकर निदान करण्यात मदत करते. हे तंत्रज्ञान अमेरिकेतील 15,000 हून अधिक आणि भारतातील 700 रुग्णांवर चाचणीसाठी वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाची अचूकता 96 टक्क्यांहून अधिक असल्याचा दावा केला जात आहे.

 आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी X (ट्विट) वरील पोस्टमध्ये लिहिले की, 14 वर्षीय सिद्धार्थ नंद्यालाने हार्टअटॅक ओळखणे अधिक सोपे केले आहे. डॅलसमधील हा युवा AI तज्ज्ञ आणि Oracle व ARM कडून प्रमाणपत्र मिळवलेला जगातील सर्वात लहान AI प्रमाणित व्यावसायिक आहे. सिद्धार्थने तयार केलेले सर्केडियन AI हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे यश असून, काही सेकंदांत हार्टअटॅकसंबंधी समस्यांचे निदान करू शकते.

सिद्धार्थच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो टेक्सास, अमेरिकेमधील स्थित Stem-It Tech या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे. सिद्धार्थचे वडील महेश मूळचे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथील आहेत. ते 2010 मध्ये अमेरिकेला स्थलांतरित झाले.