मुंबई – १ मेच्या महाराष्ट्र दिनी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे, या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी शिवसेनेकडून स्वत: आदित्य ठाकरे, अनिल परब, अजय चौधरी, प्रकाश फातर्फेकर, सूरज चव्हाण, मनीषा कायंदे, विठ्ठल मोरे असे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून स्वत: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मातेले, राखी जाधव, नरेंद्र राणे हे आले होते. तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान आणि इतर नेत्यांची उपस्थिती होती. जवळपास दीड तास सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या बैठकीनंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की “आपण सगळ्यांना माहिती आहे की, १ मेच्या वज्रमूठ सभा आयोजित करण्यात सभेच्या पूर्वतयारीसाठी आज तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते, प्रमुख जबाबदार पदाधिकारी यांना बैठकीसाठी बोलावले होते. सभा यशस्वी करण्यासाठी लागणार्या नियोजनासाठी आजची बैठक बोलावण्यात आली होती.. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मार्गदर्शन केले. या सभेसाठी लागणार्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही परवानग्या मिळाल्या आहेत, तर काही शिल्लक आहेत. त्याही लवकरच मिळतील. या सभेसाठी सरकारकडून कुठलीही अडवणूक होत नाहीय.“
महाविकास आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे या सभेतही प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांची भाषणे होणार आहेत. त्यांची नावे नंतर ठरवण्यात येतील, अशीही माहिती अनिल परब यांनी दिली.