मुंबई – राज्याची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला ३.५ कोटींचा धनलाभ झाला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच लहान – मोठ्या पक्षांसह अपक्ष, बंडखोर व अनेक उत्सुक उमेदवार सहभागी झाले होते. विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यात ४१३६ उमेदवार मैदानात उतरले होते. त्यापैकी तब्बल ३५१५ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.
आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उमेदवार म्हणून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला १० हजार रुपये रक्कम डिपॉझीट म्हणून आयोगाकडे जमा करावी लागते. तर एससी, एसटी उमेदवारांसाठी ही रक्कम ५ हजार रुपये असते. मात्र एकूण वैध मतांपैकी १ षष्ठमांश कमी मते मिळाल्यास उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वात जास्त उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले असून, भाजपाच्या एकही उमेदवाराचे डिपॉझीट जप्त झालेले नाही. मविआमध्ये कॉंग्रेसच्या ९,ठाकरे गटाच्या ८,शरद पवार गटाच्या ३ व शेकापच्या २ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. तर महायुतीतील शिंदे गटाच्या १ आणि अजित पवार गटाच्या ५ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. मनसे व वंचित या दोन पक्षाचे मोजके उमेदवार वगळता बहुतांश उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.