मुंबई – ग्राहकांना सोयीची ठरणारी आणि ग्राहकांसाठी २४ तास सुरू असलेल्या दुकानांवर वेळेचे कोणतेही बंधन नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. पुण्यातील हडपसर भागातील एक दुकान रात्री ११ वाजेपर्यंत बंद करण्यास पोलीस सांगत आहेत. या विरोधात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. स्थानिक पोलिसांकडून होत असलेल्या हस्तक्षेपावर न्यायालयाने आक्षेप घेतला.
खंडपीठाने आदेशात नमूद केले की, आठवड्यातील सातही दिवस २४ तास सुरू कंव्हिनियन्स स्टोअरची संकल्पना जगभर लोकप्रिय आहे. त्याच्या फायद्यांचा विचार करत आणि जागतिक मानकांसह प्रगती साधण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने अशा स्टोअर साठी कोणतेही वेळेचे बंधन लादलेले नाही. ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे आणि अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे अर्थव्यवस्था वाढवण्यास ही सुविधा मदत करते. कोणताही कायदा हे कंव्हिनियन्स स्टोअर २४ तास सुरू ठेवण्यास मनाई करत नाही. त्यामुळे पोलिसांनी रात्री ११ नंतर दुकाने बंद करण्याचा आदेश देऊ नये.