उडिपी – गेल्या २० वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी नेता विक्रमगौडा, आज कर्नाटकातील कब्बीनेल मध्ये नक्षलवाद विरोधी पथकाबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला. मात्र त्याच्या सोबत असलेले अन्य ४ नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या शोधासाठी सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे.
कर्नाटक नक्षलवादविरोधी पथक गेल्या काही वर्षांपासून ८ नक्षलवादी नेत्यांचा शोध घेत होते. त्यातील विक्रमगौडा आपल्या ५ साथीदारांसह उडिपी जिल्ह्यातील कब्बीनेल गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे नक्षलवादविरोधी पथकाने सापळा लावला . मात्र विक्रम गौडा येताच त्याला पोलिसांनी घेरण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याच्यासोबत असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या चकमकीत विक्रमगौडा मारला गेला तर त्याच्यासोबत असलेले ४ नक्षलवादी पळून गेले. विक्रमगौडावर साडेतीन लाखांचे इनाम होते.