नंदुरबार- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील ऐतिहासिक दत्त यात्रोत्सव १४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा नवीन रथातून दत्तप्रभूच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.हा आकर्षक नक्षीकाम केलेला रथ राजस्थानातील पाली येथून
मंदिर प्रशासनाने विकत घेतला आहे.हा रथ १० डिसेंबर रोजी मंदिरात दाखल होणार असल्याची माहिती सारंगखेडा येथील एकमुखी दत्त मंदिर ट्रस्टचे सचिव भिकन पाटील, चेअरमन अंबालाल पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील यांनी दिली.
या नवीन रथासाठी मंदिर प्रशासनाने १७ लाख रुपये खर्च केले आहेत.यात्रेनिमित्त शहादा येथील अग्निशमक दलाच्या बंबाने संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिर पाण्याने धुवून काढले आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था,पाणी,स्वच्छतागृह आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.या यात्रेनिमित्त याठिकाणी घोड्यांचा मोठा बाजार भरत असतो.त्यामुळे या यात्रेला घोड्यांची यात्रा असेही संबोधले जाते.