हिवाळी अधिवेशनात विधानसभेत ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

नागपूर – राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत आज विविध खात्यांशी संबंधित ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुंबई मेट्रो, सहकारी साखर कारखान्यांना कर्ज , दूध अनुदान योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आदि महत्वपूर्ण मागण्यांसाठी निधीचे नियोजन यात करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी पुरवणी मागणी केली आहे .
केंद्र सरकारच्या योजना राज्यांत राबवण्यासाठी ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्जाकरिता ३ हजार ७१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शेतकरी वीज बिल माफीसाठी ३ हजार ५० कोटी रुपये , विविध पाटबंधारे महामंडळांना विविध योजना अंतर्गत भागभांडवली मदत म्हणून १ हजार ९०८ कोटी रुपये अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
मुंबई मेट्रो रेल्वेच्या कामासाठी १ हजार २१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोदी आवास योजनेसाठी १ हजार २५० कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्यांना कर्जासाठी (मार्जिन मनी लोन) १ हजार २०४ कोटी रुपये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आशियाई बँकेकडून १ हजार १७० कोटी रुपयांचे अर्थसाह्य, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्याचा हिस्सा म्हणून ८१४ कोटी रुपये, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मुद्रांक शुल्क अधिभाराचे ७७८ कोटी रुपये , एकत्रित प्रोत्साहन योजनेअंतर्गत लघु,मध्य, मोठ्या उद्योग घटकांना आणि मोठ्या प्रकल्पांना प्रोत्साहनपर रकम देण्यासाठी १ हजार कोटी रुपये, दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी रुपये, अंगणवाडी कर्मचारी मानधनवाढ व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी राज्य सरकारचा अतिरिक्त हि्ससा म्हणून २९० कोटी रुपये अशा एकूण ३५ हजार ७८८.४० कोटी रूपयांच्या या २१ पुरवणी मागण्या आहेत. अधिवेशनामध्ये या मागण्यांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी दिली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top