मुंबई – आपल्या देशाच्या प्रचंड लोकसंख्येचा आपण साधन म्हणून वापर केला तर येत्या काळात हिंदूंचा विकास दर जगाला दिशा दाखवू शकले,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित जागतिक हिंदू आर्थिक परिषदेत ते बोलत होते.
परदेशांमधील संस्कृती आणि आपली हिंदू संस्कृती यामध्ये प्रचंड अंतर आहे. परदेशात जो ताकदवान असतो त्यालाच सर्व लाभ मिळतात. मात्र आपल्याकडे कमकुवत माणसाची मदत करण्याची संस्कृती आहे.आपण कोणाला लुटले नाही. दुसऱ्याचे लुबाडणाऱ्याला आपण मोठे मानत नाही. स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती पाहिल्यास १९९० च्या दशकात आपली थट्टा उडवली जात होती. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, हिंदू विकास दर जगाला दिशा दाखवेल.
आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहोत. आपली लोकसंख्या खूप जास्त आहे. पण याच गोष्टीला आपण साधन म्हणून वापरले तर विकसित होऊ शकतो याचे उदाहरण माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी जगाला घालून दिले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी दमदार वाटचाल करीत आहेत,असे फडणवीस पुढे म्हणाले.