हरियाणात शेतकरी आंदोलनाचा प्रभाव नाही भाजपा विजयी! काश्मीरला मात्र 370 चा झटका

नवी दिल्ली – हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. यात हरियाणाचे निकाल अनपेक्षित ठरले. भाजपाने काँग्रेसला पराभवाची धूळ चारत सलग तिसर्‍यांदा राज्याची सत्ता मिळवण्याचा चमत्कार करून दाखवला. भाजपा सरकारने लादलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आणि किमान आधारभूत किंमत यासाठी हरियाणातील शेतकर्‍यांनी दीड वर्षे रस्ते अडवून आंदोलन केले होते. त्यात कुस्तीपटूंचे आंदोलन झाले. या दोन्हीचा भाजपाला फटका बसून काँग्रेसची सत्ता येईल असेच वातावरण होते. परंतु या आंदोलनाचा कुठलाही प्रभाव मतदारांवर पडला नाही. उलट भाजपाच्या सीट यावेळी वाढल्या. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युतीने बाजी मारली असली तरी काँग्रेसला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे नेतृ्त्व हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांत अपयशी ठरले आहे. हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. या निकालाने भाजपाचे मनोधैर्य वाढले असल्याचा महाविकास आघाडीला फटका बसेल.
आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या कलानुसार हरियाणात काँग्रेस मोठ्या आघाडीवर होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिलेबी वाटायला सुरुवात केली. मात्र काही मिनिटांतच चित्र पूर्णपणे पालटून भाजपाने जोरदार मुसंडी मारली. दुपारपर्यंत सत्तास्थापनेसाठी 46 चा बहुमताचा जादुई आकडा पार करून भाजपाने हरियाणात तिसर्‍यांदा एकहाती सत्ता मिळवली. सैन्य भरतीची अग्निवीर योजना लागू करण्याला झालेला तीव्र विरोध, दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन आणि सुमारे दीड वर्ष चाललेले शेतकरी आंदोलन यामुळे हरियाणात भाजपाविरोधी वातावरण तयार झाले होते. त्याचा भाजपाला जोरदार फटका बसेल, असे म्हटले जात होते. याचा अंदाज आल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने हरियाणात नेतृत्त्वबदल केला. मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. हरियाणात शेतकरी आंदोलनामुळे जाट मतदारांच्या नाराजीचा फटका बसणार, हे लक्षात आल्यामुळे नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून भाजपाने ओबीसी कार्ड खेळले. त्यामुळे ओबीसी आणि सवर्ण समाजाचा प्रभाव असलेल्या कर्नाल, फरीदाबाद, गुडगाव, भिवानी-महेंद्रगढ आणि कुरुक्षेत्र या पाच जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. संपूर्ण प्रचारात ब्रँड मोदीचाही फायदाही भाजपाला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरीने हरियाणात 14 जाहीर सभा घेतल्या. मागासवर्गीय समाजाची क्रिमिलेयरची मर्यादा सहा लाखांवरून आठ लाखांवर नेणे, राज्य शासनातील इतर मागासवर्गीयांचे गट अ आणि गट ब साठीचे आरक्षण 15 टक्क्यांवरून 27 टक्क्यांपर्यंत वाढवणे, असे काही निर्णय भाजपासाठी फायद्याचे ठरले.
काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवली होती. हरियाणात राहुल गांधी यांनी डझनभर सभा घेत विजय संकल्प यात्रा काढली होती. परंतु काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी सेलजा या तिकीटवाटपावरून नाराज असल्याने त्यांनी स्वतःला प्रचारापासून दूर ठेवले. राहुल गांधी यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला , पण प्रमुख नेत्यांमधील या अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला.
भाजपाने विजयाचा गुलाल उधळला तरी संजय सिंह, कंवरपाल गुर्जर, डॉ. कमल गुप्ता, रंजीत चौटाला आणि सुभाष सुधा हे त्यांचे मंत्री पराभूत झाले आहेत.तर मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी लाडवा मतदारसंघातून विजय मिळवला. भाजपा नेतृत्वाने नायब सैनी मुख्यमंत्रिपदी राहतील हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी कुस्तीपटू विनेश फोगटने जुलाना मतदारसंघातून विजय संपादन करत राजकारणातील नवा डाव सुरू केला. देशातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या सावित्री जिंदाल यांना भाजपाने तिकीट नाकारले होते. त्यांनी हिसार मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय नोंदवला.
काँग्रेसचे भूपिंदरसिंह हुड्डा यांनी गढी सापला की लाई या मतदारसंघातून विजय मिळवला. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने गेल्या वेळी 10 जागा जिंकल्या होत्या. यावेळी जेजेपीला एकही जागा जिंकता आली नाही. स्वतंत्र लढणार्या आपलाही हरियाणात भोपळा मिळाला. तर भारतीय राष्ट्रीय लोकदलाने 2 जागांवर विजय मिळवला.

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीचा धुव्वा
जम्मू-काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती केली होती. या युतीने 48 जागा जिंकत विजयपताका फडकावली. यात नॅशनल कॉन्फरन्सने 42 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस उमेदवार 6 जागांवर जिंकली. 2014 मध्ये सत्तेत असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीला फक्त 3 जागा मिळाल्या. मेहबूबा यांची कन्या इल्तेजादेखील पराभूत झाली. जम्मू-काश्मीरमधील विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे बडगाम व गांधरबल या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून जिंकलेले ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निर्णयामुळे भाजपाला काश्मीर खोर्‍यात एकही जागा जिंकता आली नाही. जम्मूमध्ये अपेक्षित यश मिळाले तरी सत्तेत येता आले नाही. या विजयानंतर काँग्रेसने जाहीर केले की, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही तरी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 370 कलम काढल्यावर हिंसाचार होईल असे लोक म्हणत होते. पण आता शांतपणे निवडणूक पार पडली हा लोकशाहीचा विजय आहे.

हरियाणा (90 सीट)
2019 2024
भाजपा – 40 48
काँग्रेस – 31 37
जेजेपी – 10 0
आप – 0 0
अपक्ष – 0 2
इतर – 9 3

जम्मू-काश्मीर (90 सीट)
2014 2024
पीडीपी – 8 03
भाजपा – 25 29
नॅशनल
कॉन्फरन्स – 5 42
काँग्रेस – 12 06
अपक्ष – 3 07
इतर – 4 03

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top