तिरुवनंतपुरम – देवी देवतांच्या मिरवणूकीत हत्ती नसण्याने हिंदू धर्माला काही धोका नाही. हिंदू धर्म इतका नाजूक नाही की हत्ती नसण्याने संपेल असे कठोर ताशेरे केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एका मंदिर संस्थेची याचिका फेटाळतांना ओढले आहेत. केरळ उच्च न्यायालया समोर काल कोचिन देवासोम बोर्डाने ही याचिका दाखल केली होती.
त्रिपुनीथुरा येथील पुर्णर्थयेसा मंदिरातील व्रिश्चिकोलसावम उत्सवासाठी १५ हत्ती आणले जातात . नियमानुसार हत्तींमध्ये किमान ३ मीटर अंतर ठेवावे लागते . मात्र इतके अंतर ठेवले तर १५ हत्ती मंदिरासमोर उभे करता येणार नाहीत. त्यामुळे ही अंतराची अट शिथिल करण्याची मागणी या संस्थेने केली होती. न्यायमूर्ती ए.के.जयशंकर नंबियार व गोपीनाथ पी यांच्या पीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की ही अट प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या परंपरा व लोकांच्या धार्मिक भावनांचा विचार करता तिथे हत्ती असणे एकवळेस मान्य करता येईल. मात्र ती काही अत्यावश्यक अशी बाब नाही. तीन मीटर पेक्षा कमी अंतर ठेवणे कसे योग्य आहे ते तुम्हाला पटवून द्यावे लागेल. न्यायमूर्ती नांबियार यांनी या वेळी हे स्पष्ट केले की हिंदू धर्म काही इतका नाजूक नाही की एका कार्यक्रमात हत्ती नसण्याने तो कोसळेल. अत्यावश्यक धार्मिक विधी वगळता इतर सर्व बाबी या कायद्याच्या चौकटीतच असायला हव्यात असेही न्यायालयाने स्पष्ट केले.