हडप्पा नाही, सिंधू-सरस्वती संस्कृती ‘एनसीईआरटी’चा वादाचा नवा धडा

नवी दिल्ली – एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग)च्या इयत्ता सहावीच्या समाजशास्त्र विषयाचे नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्राचीन हडप्पा संस्कृतीचा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ असा करण्यात आला आहे. या पुस्तकात अनेक ठिकाणी लुप्त झालेल्या सरस्वती नदीचाही उल्लेख आहे. याशिवाय भारताचे ‘उज्जयिनी रेखावृत’ नावाचे भारताचे स्वतःचे विषुववृत्त होते, असा उल्लेख आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकाच्या मजकुरात बदल करून इतिहासाची मोडतोड केल्याच्या आरोपामुळे यापूर्वीही अनेकदा वाद झाला असून, आता हे नवे पुस्तकही वादात सापडण्याची शक्यता आहे.
‘एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड’ असे या पुस्तकाचे नाव असून, ते या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शाळांमध्ये वापरले जाणार आहे. यापूर्वी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयांसाठी ‘एनसीईआरटी’ची स्वतंत्र पुस्तक होती. परंतु नवीन अभ्यासक्रमात समाजशास्त्राचे एकच पुस्तक तयार करण्यात आले असून, पुस्तक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘इंडिया अँड द वर्ल्ड: लँड अँड पीपल; टेपेस्ट्री ऑफ द पास्ट’, ‘अवर कल्चर हेरिटेज अँड नॉलेज ट्रॅडीशन्स’, ‘गव्हर्नन्स अँड डेमोक्रसी’, ‘इकॉनामिक लाईफ अराउंड अस’ या पाच प्रमुख विषयांमध्ये विभागले आहे. या नवीन पाठ्यपुस्तकात सरस्वती नदीचे अनेक संदर्भ देण्यात आलेले आहेत. जुन्या पाठ्यपुस्तकात या नदीचा उल्लेख फक्त वैदिक सूक्तांमध्ये आलेले नदीचे नाव असा होता. नव्या पुस्तकातील ‘बिगिनिंग ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’ या धड्यात सरस्वती नदीला विशेष स्थान मिळाले आहे. त्यात हडप्पा संस्कृतीला ‘सिंधू-सरस्वती’ किंवा ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’ म्हणून संबोधले आहे. इतकेच नाही तर हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहरे सरस्वती नदीच्या खोर्‍यात विकसित झाली. यात राखीगढी आणि गणवेरीवाला यांसारख्या मोठ्या पुरातत्त्वीय स्थळांचा समावेश होता. सरस्वती नदी आज भारतात ‘घग्गर’ आणि पाकिस्तानमध्ये ‘हाकरा’ (म्हणून ‘घग्गर-हाकरा नदी’) या नावाने ओळखली जाते. आता ती हंगामी आहे, असेही नमूद करण्यात आलेले आहे.
या पुस्तकातील नकाशात ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’च्या मुख्य वसाहती सिंधू आणि तिच्या उपनद्यांसह दाखवल्या गेल्या आहेत.नव्या पुस्तकात हडप्पा संस्कृतीचा र्‍हास कसा झाला, याची कारणे देताना दोन प्रमुख कारणे देण्यात आली आहेत. त्यात वातावरणातील बदलामुळे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि या नदीच्या खोर्‍यात विकसित झालेली कालीबंगा किंवा बाणावली यांच्यासारखी शहरे नामशेष होणे, जुन्या पुस्तकात सरस्वती नदी कोरडी पडल्याचा उल्लेख नव्हता.
यापूर्वी एनसीईआरटीच्या इयत्ता अकरावीच्या पुस्तकातून 2002 च्या गुजरात दंगलीचे संदर्भ हटवण्यात आले होते. 10 वीच्या पुस्तकातून लोकशाहीवरील धडा वगळण्यात आला होता. नववी आणि दहावीच्या पुस्तकातून तक्ते हटवण्यात आले होते. समाजशास्त्राच्या पुस्तकातून नक्षलवादाशी संबंधित मजकूरही गाळण्यात आला होता.
बारावीच्या पुस्तकातून खलिस्तानचे संदर्भ काढून टाकण्यात आले. काही इयत्तांच्या इतिहासाच्या पुस्तकातून मोगलांशी संबंधित संदर्भांनाही वगळण्यात आले. याचा निषेध म्हणून एनसीईआरटीच्या देशभरातील 33 सल्लागारांनी या पुस्तकावरून आपले नाव हटवण्यास सांगितले होते. मात्र, एनसीईआरटीएने आपल्या पुस्तकात वादग्रस्त बदल करण्याचे चालूच ठेवले असल्याने इतिहासकार आणि समाजशास्त्र अभ्यासक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top