हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! सिडकोने 26 हजार घरांच्या किंमती केल्या जाहीर

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर खरेदी करण्याचं अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडको महामंडळाने नवी मुंबईतील 26 हजार घरासाठी काढलेल्या लॉटरीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सिडकोने कोकण विभागातील घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. घरांच्या किंमती या 25 लाख रुपयांपासून ते 97 लाख रुपयांपर्यंत आहे. यामुळे आता मुंबई व आजुबाजूच्या परिसरात घर खरेदी करू इच्छित असणाऱ्या नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सिडकोने (CIDCO Lottery) ‘माझे पसंतीचे सिडको घर’ या योजनेंतर्गत 26 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे आता नागरिकांना घरांसाठी अर्ज करता येणार आहे. याआधी देखील 3 वेळा अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली होती. मात्र, घराच्या किंमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या.

घराच्या किंमती किती आहेत?

सिडकोने (CIDCO Lottery) ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील 26 हजार घरांच्या किमती जाहीर केल्या. आर्थिक दुर्बल घटक (EWS) गटासाठी घरांच्या किमती 25 ते 48 लाखांदरम्यान असतील, तर अत्यल्प उत्पन्न गट (LIG) गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत असतील.

कुठे खरेदी करता येईल घर?

सिडकोने (CIDCO Lottery) नवी मुंबईतील 67,000 पैकी 26,000 घरांची घोषणा केली आहे. नागरिकांना वाशी, पनवेल, खारघर, तळोजा, मानसरोवर, बामणडोंगरी, खारकोपर, खांदेश्वर आणि कळंबोली या भागामध्ये घरं उपलब्ध होतील.

घरासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख

सिडकोच्या (CIDCO Lottery)  या योजनेंतर्गत घर खरेदी करू इच्छित असणारे नागरिक 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय?

·       अर्ज करण्यासाठी तुम्हाला CIDCO ची अधिकृत वेबसाइट https://lottery.cidcoindia.com भेट द्यावी लागेल.

·       वेबसाइटवर गेल्यानंतर ‘Register for lottery’ पर्याय निवडा.

·       त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, पत्ता आणि बँक खात्याची माहिती भरा.

·       पुढे आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करावी लागतील.

·       सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट करताना तुम्हाला नोंदणी शुल्क भरावे लागेल.