स्वस्त होणार इलेक्ट्रिक वाहनं, अर्थमंत्र्यांनी ईव्ही सेक्टरला दिले मोठे गिफ्ट

Union Budget 2025: भारतात मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढली आहे. सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातच आता अर्थसंकल्प 2025 मध्ये देखील ईव्ही क्षेत्रासाठी सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारने महत्त्वपूर्ण खनिजांवरील बेसिक कस्टम ड्यूटी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बॅटरी, सेमिकंडक्टरच्या निर्मितीला बळ मिळणार आहे. याचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. ऑटो क्षेत्रासाठी झालेल्या या घोषणेमुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पात ऑटो क्षेत्रासाठी कोणती घोषणा झाली?

सरकारने बॅटरी, सेमीकंडक्टर आणि नवीकरणीय ऊर्जा उपकरणांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोबाल्ट, लिथियम-आयन बॅटरी स्क्रॅप, शिसे, झिंक आणि इतर 12 महत्त्वाच्या खनिजांवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या 35 अन्य वस्तू आणि मोबाईल फोन बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या 28 वस्तूंना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. याचा मूळ उद्देश या वस्तूंना कमी खर्चात आयात करून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देणे हा आहे.

इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्र मोठ्या प्रमाणात लिथियम-आयन बॅटरी, सेमीकंडक्टर यावर अवलंबून आहे. मात्र, बेसिक कस्टम ड्युटी हटवल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्यामुळे आपोआपच इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होऊन ग्राहकांना याचा फायदा होईल.