सोमवारी जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा सोहळा रंगणार!

कोल्हापूर- सालाबादाप्रमाणे यंदाही श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे.या नगरप्रदक्षिणेत सहभागी होणार्‍याला चारधाम व काशी यात्रा केल्याचे पुण्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्यामुळे या नगरप्रदक्षिणेला लाखो भाविक हजेरी लावत असतात.

सकाळी ९ वाजता सुरू होणारी नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालते.डोंगरावर स्थापन केलेल्या अष्ट तीर्थ व बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत प्रदक्षिणा सुरू असते. त्यामध्ये विणाधारी डवरी, भगवी पताका, टाळ मृदुंग वाजवीत लाखो भाविक सहभागी झालेले असतात. हे भाविक तब्बल ९ तास २५ किलो मीटरचे अंतर चालत अनवाणी जमिनीवर खाली न बसता अखंडपणे ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. यावेळी नगरप्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात फराळाचे वाटप केले जाते. सकाळी जोतिबा मंदिरात अभिषेक आरती झाल्यानंतर ही नगरप्रदक्षिणा सुरू होत असते.सायंकाळी ६ वाजता ही नगरदिंडी यमाई मंदिरात येते.त्याठिकाणी सुंठवडा वाटप केल्यानंतर नगरप्रदक्षिणेची सांगता होते.
यंदा तिसर्‍या सोमवारी श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असा दुर्मिळ योग आला आहे.