मुंबई – पोलीस मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. परभणी हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय वातावरण तापले . यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत.
अंधारे म्हणाल्या की, सोमनाथ सूर्यवंशी हा विधी विभागाचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याचा हिंसाचाराच्या घटनेशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे मी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करते की, ते तीन पोलीस अधिकारी तत्काळ निलंबित झाले पाहिजे. हे निर्दयी अधिकारी आहेत. मृत व्यक्तीची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निष्पाप युवकांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी सुरू झाली नाही आणि कारवाई झाली नाही, तर मी परभणीत जाऊन आंदोलन करणार आहे. या प्रकरणात पीआय शरद मरे , पीएसआय तुरणार आणि एलसीबीचे गोरबाण असे तीन अधिकारी दोषी आहेत.
दरम्यान, संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला. या अहलावात बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असे नमूद आहे.
तर आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर अंत्यविधीसाठी उपस्थित होते. यावेळी, घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. यामुळे घाटी रुग्णालय व परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता.